माळेगाव यात्रेत स्वच्छतेवर भर; 5 फिरती व 10 सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/12/2025 5:55 PM

नांदेड :- क्षी क्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर- दि. १९ डिसेंबर:-  श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबाच्या यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, यामध्ये स्वच्छतेस विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. यंदा माळेगाव यात्रेत एकूण पाच फिरती शौचालये तसेच दहा सार्वजनिक शौचालयांची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
     यात्रा परिसरातील प्रमुख ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फिरती शौचालये उभारण्यात आली असून नांदेड बसस्टँड परिसरात दोन, लावणी महोत्सव परिसरात एक, लातूर बसस्टँड येथे एक तसेच परभणी बसस्टँड परिसरात एक अशी एकूण पाच फिरती शौचालये कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रत्येक फिरत्या शौचालय युनिटमध्ये दहा शौचालय सीट्स असून त्यामध्ये पाच महिलांसाठी व पाच पुरुषांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण पाच युनिटमधून पन्नास शौचालय सीट्स भाविकांच्या वापरासाठी उपलब्ध आहेत. या सर्व ठिकाणी नियमित सफाई कर्मचारी नेमण्यात आले असून आवश्यक पाणीपुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
     तसेच पर्यटन विकास विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली दहा सार्वजनिक शौचालये दुरुस्ती करून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या सार्वजनिक शौचालयांमध्ये एकूण साठ शौचालय सीट्स उपलब्ध असून बाथरूमची सुविधाही पुरविण्यात आली आहे. सर्व शौचालये सुस्थितीत ठेवून भाविकांच्या वापरासाठी सज्ज करण्यात आली आहेत.
      जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या पुढाकारामुळे यंदा माळेगाव यात्रेत स्वच्छताविषयक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध होऊ शकल्या आहेत.  नायगाव, मुदखेड, उमरी, देगलूर व बिलोली येथील नगरपरिषदांच्या सहकार्याने ही फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
     या सुविधांमुळे यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत असून माळेगाव यात्रेत यंदा स्वच्छतेचे सकारात्मक व समाधानकारक चित्र दिसून येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या