नांदेड - माळेगाव यात्रेत दरवर्षी विविध पशु-पक्षी स्पर्धा तसेच खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेत सव्वा कोटी रुपये किंमत असलेला उस्मानाबादी जातीचा बोकड विशेष आकर्षण ठरला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अंबाळी येथील रमाकांत यादवकळे यांनी हा बोकड विक्रीसाठी माळेगाव यात्रेत आणला आहे. हा बोकड पूर्णतः आकर्षक काळ्या रंगाचा असून, त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात नैसर्गिकरीत्या उर्दूमध्ये अल्लाह असे लिहिल्यासारखे चिन्ह दिसून येत असल्याचे मालकांनी सांगितले.
या वैशिष्ट्यांमुळे यात्रेत आलेल्या अनेक ग्राहकांची या बोकडावर नजर खिळली असून, आतापर्यंत 25 लाख रुपयांपर्यंत मागणी आली आहे. मात्र मालक रमाकांत यांनी स्पष्टपणे सांगितले की, सव्वा कोटी रुपये किंमत मिळाल्याशिवाय बोकड विकला जाणार नाही.
माळेगाव यात्रा पशुव्यापारासाठी प्रसिद्ध असली तरी, इतक्या किमतीचा बोकड पहिल्यांदाच यात्रेत दाखल झाल्याने भाविक व व्यापाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. बोकडाच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेतली जात असून, त्याला शेंगदाणा पेंड, सोयाबीन, गहू यांसारखे पोषक खाद्य दिले जाते. या बोकडाच्या विक्रीसाठी बॅनरद्वारे जाहिरात करण्यात येणार असून, त्याच्या आकर्षक रूपामुळे तो यात्रेतील पाहुण्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे. बोकड पाहण्यासाठी यात्रास्थळी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.