नववर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि नव्या स्वप्नांनी व्हावी, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र १ जानेवारी २०२६ रोजी सांगली शहरातील व्यंकटेश नगर परिसरात संध्याकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेने ही सर्व स्वप्ने क्षणात चिरडली.
अवघ्या ४ वर्षांचा ध्रुव गोपाळ लड्डा… खेळण्याच्या वयात असलेला एक निरागस जीव. अचानक एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. बाळाला जमिनीवर पाडून चेहऱ्यावर चावे घेत गंभीर जखमा केल्या. त्या क्षणाची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या आजोबांनी कोणताही विलंब न करता त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि संपूर्ण शहर त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.
लड्डा कुटुंबियांची माझी वैयक्तिक ओळख नाही. मात्र ही घटना समजताच मी सतीश साखळकर यांच्याकडून त्यांचा संपर्क क्रमांक घेतला आणि काल त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या मुलाची विचारपूस केली, घटनेचा क्रम ऐकून घेतला. ते शब्द ऐकत असताना क्षणभर डोळ्यांत अश्रू दाटून आले.
कारण… मलाही २ वर्षांचा मुलगा आहे. त्या पालकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं आणि मन सुन्न झालं. “हे जर माझ्यासोबत घडलं असतं तर?” हा विचार रात्रभर डोक्यात घोंगावत राहिला. त्या आई-वडिलांची असहाय्यता, आजोबांचा थरथरता हात, आणि त्या चिमुकल्याचा वेदनेचा आवाज हे सगळं मनातून जात नव्हतं.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, हा प्रशासनाच्या उदासीनतेचा आरसा आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला जातो, मात्र उपाययोजना कागदावरच राहतात. आज एक निरागस जीव गंभीर जखमी आहे, उद्या कोण?
मी तयार केलेले हे व्यंगचित्र कोणत्याही व्यक्तीला दुखावण्यासाठी नाही, तर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आहे. प्रश्न एवढाच आहे आणखी किती निष्पाप जीवांच्या वेदना सहन केल्यावर आपण जागे होणार?
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका चिमुकल्याच्या आयुष्यात भीती कोरली गेली… आता तरी जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे.
रोहित कबाडे, व्यंगचित्रकार