सांगली, दि. ४,
सांगली जिल्ह्यात गेल्या काही काळापासून अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी 'अमली पदार्थ मुक्त सांगली' करण्यासाठी थेट जिल्ह्यातील प्रमुख आमदारांशी संपर्क साधून त्यांना विधानसभेत आवाज उठवण्याचे साकडे घातले आहे.
मनोज भिसे यांनी दूरध्वनीवरून जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने आमदार सुहास बाबर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार अरुण अण्णा लाड यांचा समावेश आहे.
अमली पदार्थांचे संकट रोखण्याची मागणी
या चर्चेदरम्यान भिसे यांनी आमदारांना जिल्ह्याची सद्यस्थिती सांगितली. "सांगलीला सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे, मात्र अलीकडे शहरासह ग्रामीण भागात अमली पदार्थांचे जाळे पसरत आहे. हे वेळीच न रोखल्यास गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होतील," अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आगामी अधिवेशनात आवाज उठवणार
मनोज भिसे यांनी या सर्व आमदारांना विनंती केली की, आगामी विधानसभा अधिवेशनात सांगलीतील अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीवर आणि पोलिसांच्या कारवाईवर चर्चा घडवून आणावी. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांनीही हा प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले आहे.
"सांगलीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तरुणांना या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत."
*मनोज भिसे (अध्यक्ष, लोकहित मंच सांगली)