*शिवविजय फाउंडेशनचे स्वा.सावरकर गौरव पुरस्कार जाहीर*
*_ज्येष्ठ नेते एकनाथ शेटे यांना जीवनगौरव!_*
भगूर:- येथील शिवविजय फाउंडेशनच्या वतीने भगूरपुत्र स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार-२०२६' शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण शुक्रवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
विश्व हिंदू परिषद आणि भगूर शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवणारे माजी नगराध्यक्ष एकनाथ शेटे यांना यंदाचा 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे (सहकार), भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी (राजकीय), नाशिक मनपाचे माजी नगरसेवक आणि प्रख्यात सर्जन डॉ.राजेंद्र जाधव (आरोग्य), ज्येष्ठ उद्योजक उत्तमराव शिंदे (उद्योग), भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर (अध्यात्म), मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक जयेश मेस्त्री (साहित्य), नाशिक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे (पत्रकारिता), प्रयोगशील युवा शेतकरी गणेश निसाळ (कृषी), आंतरराष्ट्रीय क्रीडापटू संग्राम गायकवाड (क्रीडा), धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील (सामाजिक), महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत चित्रा भवरे (महिला सबलीकरण), एरंडोलच्या 'पुस्तकांचा बगीचा' या अभिनव उपक्रमाचे शिल्पकार आणि सध्या छ.संभाजीनगर महापालिकेतील उपायुक्त विकास नवाळे (शासकीय सेवा), उपक्रमशील अध्यापक आणि व्याख्याते प्रा.हेमंत टिळे (शिक्षण), सुप्रसिद्ध नृत्यांगना शिवानी जोशी (कला/संस्कृती), संपूर्ण भारतात आपल्या विविधांगी उपक्रमांनी गौरविल्यालेल्या नाशिकरोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीला संस्था पातळीवरील 'स्वा.सावरकर गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे. सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवविजय फाउंडेशन भगूर ( नाशिक ) आणि स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी केले आहे.