मान्सूनपूर्व तयारी: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेकडून शोध व बचाव कार्याचे मॉक ड्रिल

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/05/2026 8:37 PM

नांदेड  : आगामी पावसाळा आणि मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूर आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या आदेशानुसार आज अग्निशमन दलाच्या वतीने दि.२२.०५.२०२६ रोजी गोदावरी नदी पात्रात विष्णपुरी काळेश्वर डॅम याठिकाणी शोध व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक म्हणजेच 'मॉक ड्रिल' यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर येणे, सखल भागात पाणी साचणे किंवा नागरिक पुरात अडकणे अशा आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता असते. अशा वेळी कमीत कमी वेळेत नागरिकांचे प्राण वाचवणे आणि मदत कार्य पोहोचवणे या उद्देशाने हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शोध मोहिमेसाठी स्पीड बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग, अत्याधुनिक दोरखंड आणि शोध दिव्यांचा वापर करण्यात आला.याप्रसंगी प्रामुख्याने अग्निशमन विभागाकडे असलेल्या Inflatable Rubber Baot चे प्रात्यक्षिक आणि Out Boat  मशीनची पाण्यात वापरुन तपासणी करण्यात आली.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला तात्काळ द्यावी. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून नागरिक, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय राखला जात आहे. या मॉक ड्रिल प्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन गाढवे, अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यु प्रात्यक्षिक पार पडले. या सरावात अग्निशमन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या