नांदेड :-- पशुसंवर्धन विभाग नांदेड व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मे पशुसंवर्धन दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिजाई ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच पशुमधील अनियमित माज व वंध्यत्व निवारण या विषयावर Intas Animal Health यांच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांना कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम या विषयावर जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील नवनियुक्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पशुवैद्यकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या कार्याचे कौतुक करत नांदेड जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त केली व विभागाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. राजकुमार पडिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे तसेच कैलास तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. निरंजन बागल तसेच महावेट नांदेडच्या कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.