नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/05/2026 8:48 PM

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरात एक मोठी आणि धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज या मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे सर्व अनधिकृत बांधकामे या कारवाईदरम्यान जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सदरील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत नव्याने प्रस्तावित असुन भुमी अभिलेख विभागाने दिलेल्या रेखांकनानुसार आज महापालिका व पोलीस विभगाने संयुक्तपणे ही मोहिम राबविली आहे. या धडक कारवाईमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला या भागातील वाहतुकीचा व रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

त्याचप्रमाणे नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज रोडवरील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे हटवून नाला पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. शहरातील वर्दळीचा चौक समजल्या जाणाऱ्या नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज दरम्यान असलेल्या मुख्य नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण झाले होते. यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित होऊन परिसरात पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. २ जेसीपी, मनपाचे अतिक्रमण पथक आणि पुरेशा पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.या कारवाईमुळे नाल्याचा प्रवाह सुरळीत होऊन रस्त्यावरील वाहतूक कोंडी देखील सुटण्यास मदत होणार आहे.

या कारवाई दरम्यान नमस्कार चौक, आयटीआय कॉर्नर ते थेट एम.जी.एम. कॉलेज पर्यंतचा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. नाथ नगर पाटी ते एम.जी.एम.कॉलेज रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत शेड, हातगाड्या, फलक आणि दुकानांचे वाढीव बांधकाम पाडण्यात आले व साहित्य जप्त करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर,
नांदेड उत्तर अतिक्रमण प्रमुख दत्ता कल्याणकर  अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.

महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यापुढे जर कोणी या भागात पुन्हा अतिक्रमण अथवा बांधकाम करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. ही मोहीम शहरात इतरत्रही अशीच सुरू राहणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या