नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडून शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज या वर्दळीच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे.
या कार्यवाही दरम्यान उजवी बाजू नमस्कार चौक ते कल्वर्ट ते एम.जी.एम कॉलेज च्या विरुद्ध बाजूच्या रेणापूरकर बिल्डिंग पर्यंतचे अतिक्रमण काढन्यात आले. नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज परिसर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले अनधिकृत ओटे, शेड, केबिन्स आणि फलक हटवण्यात आले. या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथका मार्फत जेसीबी यंत्रणा आणि ट्रकचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात नांदेड उत्तर अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर
कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.
नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषतः नमस्कार चौक ते एम.जी.एम. कॉलेज हा रस्ता शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुसऱ्या दिवसाची मोहीम ही पहिल्या दिवसाच्या कारवाईनंतर उरलेली अतिक्रमणे आणि काही दुकानदारांनी पुन्हा लावलेले साहित्य दुसऱ्या दिवशी धडक मोहीम राबवून जप्त करण्यात आले. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. या कारवाईमुळे रस्ता रुंद झाला असून वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.