नांदेड:- दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.सदर मोहिमेच्या 22 व्या दिवशी, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने, लातूर जिल्ह्यातील किनगांव पोलीस ठाणे हद्दीत मौजे खंडाळी शिवार येथे तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या (8) इसमांविरुद्ध कार्यवाही करून त्यांच्याकडून रोख रकमेसह 8,48,250/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणी किनगांव पोलीस ठाणे येथे जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच, परिक्षेत्रात मटका जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (29) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (8) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 9,05,400/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, अवैध दारू विक्री करणाऱ्या (19) इसमांविरुद्ध (19) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 28,600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर, अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 51,79,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्धही (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 2,53,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (1), कोटपा अन्वये (4) तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (42) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण 63,92,465/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खबर ' हेल्पलाइन वरून माहिती द्या: अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या
दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.