दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रीय लेखक संघटना यांच्यावतीने संघटनेच्या संविधानानुसार आयोजित गेलेल्या महासभेमध्ये
साहित्य क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा प्रमुख पाच श्रेणीमध्ये विविध पुरस्कार देऊन आज (दि २३ मे) गौरव करण्यात आला. महासभेला दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कगालेमा मोटलांथे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
जीवन गौरव पुरस्कारासोबतच ग्रँड पॅटर्न ऑफ द आर्ट्स अवार्ड, फ्रेंड्स ऑफ नवासा पुरस्कार, रायझिंग स्टार व प्रेसिडेंटस् अवार्ड हे नॅशनल असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिकाच्या वतीने प्रत्येक तीन वर्षांनी देण्यात येणारे पुरस्कार महासभेत प्रदान करण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेतील मराठी साहित्याचा भाषांतराच्या माध्यमातून प्रसार व संवर्धन केल्याबद्दल व आंतरराष्ट्रीय ऐक्याला बळ दिल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांना 'फ्रेंड्स ऑफ नवासा' हा पुरस्कार देऊन महासभेत सन्मानित करण्यात आले.
मानपत्र आणि स्वविशिष्ट पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुवर्ण झळाळी असणाऱ्या पदकावर अफ्रीका खंडाचा नकाशा व पॅन आफ्रिकन रिबन आहे. डॉ. तौर यांनी दृकश्राव्य उपस्थितीद्वारे हा सन्मान स्वीकारला. डॉ पृथ्वीराज तौर यांच्या समवेत जिदी माजिया (चिन), दाझरा नोव्हाक (क्युबा), मुराद अल सुदानी (पॅलेस्टाइन), वादिम तेरेखिन (रशिया), मार्कोस फ्रेटास (ब्राझिल), झुकिस्वा वॅनर (दक्षिण अफ्रिका), शॅड चिकोटी (मलावी) या लेखकांनाही 'फ्रेंड्स ऑफ नवासा' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. तौर हे पहिलेच भारतीय लेखक व भाषांतरकार आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात डॉ. पृथ्वीराज तौर यांनी नेल्सन मंडेला यांना आपला पुरस्कार अर्पण
करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या सन्मानासाठी कुलगुरू डॉ मनोहर चासकर आणि अन्य अधिकारी यांनी डॉ. पृथ्वीराज तौर यांचे अभिनंदन केले.