नांदेड : मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या SIR (Special Intensive Revision) विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली असून हा कार्यक्रम २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचे गणना प्रपत्र डाउनलोड करून ते संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी ८७–दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक विभागाला भेट देऊन गणना फॉर्म डाउनलोड प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत प्रक्रिया वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या पाहणीदरम्यान उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने उपस्थित होते. तसेच ८७–नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक मतदार नोंदणी अधिकारी नितेशकुमार बोलोलू यांनी सुरू असलेल्या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मतदारांची संख्या २७७७०७३ एवढी असून छपाई करावयाच्या गणना प्रपत्राची दुप्पट म्हणजे ५५५४१४६ एवढी आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.