मनपाच्या शाळांत ६०४ चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/06/2026 8:50 PM

 **'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात संपन्न; आयुक्त संजीता मोहपात्र यांच्या अभिनव 'दत्तक शाळा' उपक्रमामुळे शिक्षणाला मिळणार नवा वेग**

 सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा 'शाळा प्रवेशोत्सव' आज शहरातील ५१ शाळांमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात तब्बल ६०४ नवागत चिमुकल्यांनी आनंदाने प्रवेश घेतला. महापालिका आयुक्त **श्रीम. संजीता मोहपात्र (भा.प्र.से.)** यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या **"स्वागत करताना बुके नको, वह्या-पुस्तके द्या"** या अभिनव उपक्रमाला लोकप्रतिनिधी, नागरिक आणि दानशूर व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 **शैक्षणिक साहित्याचे वितरण:** या उपक्रमातून जमा झालेली पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप आज महापालिका शाळांतील अनाथ, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 * **नवागतांचे जंगी स्वागत:** शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाबपुष्प देऊन स्वागत, प्रभातफेरी आणि विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायांचे ठसे घेण्यासारखे सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता.
 प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

### **'दत्तक शाळा' उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी:**
महापालिकेच्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने 'दत्तक शाळा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आयुक्त स्तरापासून ते विभाग प्रमुखांपर्यंत ५१ हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांचे पालकत्व स्वीकारले आहे. या दत्तक पालकांमार्फत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक मदत आणि शिक्षक-पालक मेळाव्यांवर वर्षभर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आज प्रवेशोत्सवानिमित्त सर्व दत्तक पालकांनी आपापल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

### **मान्यवरांची उपस्थिती:**
या सोहळ्यात खासदार मा. विशालदादा पाटील, उपमहापौर मा. गजानन मगदूम विरोधी पक्षनेते मा. मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी गटनेते मा. मोईनुद्दीन बागवान, आणि विविध लोकप्रतिनिधी यांनी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

### **आयुक्त संजीता मोहपात्र यांचा संदेश:**
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त संजीता मोहपात्र म्हणाल्या की, "शाळेची  इमारत महत्त्वाची नसून, तिथे मिळणारे दर्जेदार संस्कार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महानगरपालिका शाळांतून अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. डिजिटल साधने, क्यूआर कोड आधारित अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे आता पालकांचा मनपा शाळांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. मी स्वतः शालेय जीवनात शिक्षकांच्या पाठबळामुळेच शिक्षण पूर्ण करू शकले, म्हणूनच शिक्षणाची ही नवी दिशा आणि यशाची खात्री देणारा हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविला जाईल."

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल रोकडे, उपायुक्त (शिक्षण) सौ. स्मृती पाटील आणि प्रशासन अधिकारी श्री. प्रकाश खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या