नांदेड : पावसाळा अगदी तोंडावर आला असून, जिल्ह्यातील बळीराजाची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, दरवर्षी पेरणीनंतर बोगस बियाणे मिळणे किंवा बियाणे न उगवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येतात. शेतकऱ्यांची अशी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून, बियाणे खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
खरीप पिकांच्या नियोजनासाठी बाजारात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. पेरणीची वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकरी आतापासूनच तयारीला लागला आहे.
कृषी विभागातर्फे आत्तापासूनच जागृती केली जात आहे. शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
*विश्वासार्ह ठिकाणाहूनच करा बियाणांची खरेदी*
शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच बियाणांची खरेदी करावी. रस्त्यावरील किंवा अनधिकृत विक्रेत्यांकडून कमी किमतीत मिळणारे बियाणे खरेदी करणे पूर्णपणे टाळावे. खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्के आणि छापील बिल आवर्जून मागून घ्यावे.
*पिशवी फेकू नका... तीच पुढे ठरू शकते पुरावा*
पेरणी झाल्यानंतर बियाणांची रिकामी पिशवी, टॅग आणि खरेदीचे पक्के बिल सुरक्षित जपून ठेवावे. बियाणे बोगस निघाल्यास किंवा न उगवल्यास कायदेशीर कारवाईसाठी हाच मुख्य पुरावा ठरतो. शेतकरी पिशवी फेकून देतात, नंतर तक्रार करणे कठीण होते.बियाणांची घरच्या घरी प्रयोगाद्वारे उगवण क्षमता तपासावी, जेणेकरून फसवणूक टळू शकेल. अधिकृत चाचणीसाठी शेतकरी बियाणांचे नमुने शासकीय बीज चाचणी प्रयोगशाळेत पाठवू शकतात.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे आणि लॉट नंबरची तपासणी करावी. फसवणूक टाळण्यासाठी मान्यताप्राप्त दुकानातूनच बियाणे घ्यावे. काही अडचण आल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा.
सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांच्या पेरणीसाठी बियाणे, खते व औषधे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊया बियाणे खरेदीत होणारी फसवणूक टळण्यासाठी काय दक्षता घ्यावी.
कृषी विभागाचे आवाहन-
बाजारात विविध कंपन्यांची बियाणे उपलब्ध झाली असून,अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच खरेदीपूर्वी पॅकेटवरील माहिती, उगवण क्षमता, उत्पादन तारीख, बॅच क्रमांक आणि कंपनीची नोंदणी तपासणे आवश्यक आहे. पेरणीनंतर समस्या निर्माण झाल्यास तक्रारीसाठी पावती, पिशवी आणि टॅग हेच महत्त्वाचे पुरावे ठरतात.
पॅकेजिंग कशी तपासणार ?
बियाण्यांची पिशवी किंवा पॅकेट खरेदी करताना ते कुठेही फाटलेले किंवा शिवलेले नाही ना, याची खात्री करा. पॅकेटवर कंपनीचे अधिकृत सील असणे अनिवार्य आहे. तसेच त्यावर उत्पादक कंपनीचे नाव, बियाण्यांचा प्रकार, लॉट नंबर, तपासणीची तारीख आणि अंतिम मुदत स्पष्ट अक्षरात छापलेली आहे की नाही, हे तपासून पॅकेट ताब्यात घ्यावे.
उगवण क्षमता कशी तपासावी ?
बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी घरच्या घरी गोणपाटावर किंवा कुंडीत काही दाणे पेरुन त्यांची उगवण क्षमता तपासूण घ्यावी. संशय असेल तर शासकीय बीज परीक्षण प्रयोगशाळेत अधिकृत नमुना पाठवून बियाण्यांची शुद्धता आणि उगवण क्षमता तपासून घेता येते.