नांदेड :- खरीप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीचा उत्पादन खर्च कमी करून अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
हवामानातील अनिश्चितता व वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांनी मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना राबवून पावसाचे पाणी शेतातच अडवावे व जमिनीत मुरवावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
तसेच कमी कालावधीच्या सुधारित सोयाबीन वाणांची निवड केल्यास पिकावरील जोखीम कमी होऊन उत्पादनात स्थिरता मिळू शकते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होतात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करता येते.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार व पुरेशी ओल उपलब्ध झाल्यानंतरच पेरणी करावी. घाईघाईने केलेली पेरणी उगवण व उत्पादनावर विपरीत परिणाम करू शकते.
उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असून त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. तसेच शिफारशीनुसार प्रक्रिया केलेले घरचे बियाणे वापरल्यास बियाणे खरेदीवरील खर्चात मोठी बचत होऊ शकते.
खरीप हंगामावर एल निनोचे गंभीर सावट निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, खंड पडणे, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विभागाचा वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे.
पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पीक पेरणीचा काटेकोर नियोजन करावे. कमी कालावधीत येणाऱ्या पिकाची लागवड करावे.
यावर्षी खरीप हंगामात पेरणी करताना नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याशिवाय खरीप पिकाची पेरणी करू नये असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. पाण्याची योग्य नियोजन करूनच पेरणीच्या कामाला प्राथमिकता घेणे गरजेचे आहे.
*पीक विमा काढा*
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नैसर्गिक आपत्तीपासून जसे अतिवृष्टी, कमी पाऊस, पावसाचा खंड व कमी उत्पादन यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पिकांचा विमा उतरवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
*शेतकऱ्यांनी नियोजन करूनच पेरणी करावी*
एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा लहरीपणा, सरासरी पेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने यावेळी वर्तवली आहे. शेतकरी बांधवांची आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून काटेकोर नियोजन करूनच खरीप हंगामाला सुरुवात करणे सोयीचे राहणार आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी घाई गडबड करू नये. मुख्य पिकांची पेरणी पुरेशा प्रमाणात (किमान ७५ ते १०० मिलिमीटर) पाऊस झाल्याशिवाय करू नये. पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने कमी कालावधीच्या पिकांची लागवड करणे सोयीचे होणार आहे.
*आंतरपिक पद्धतीचा अवलंब करा*
यावर्षीच्या खरीप हंगामात कमी दिवसात निघणारे आणि पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीच्या बियाणांची निवड करणे फायदेशीर ठरणार आहे. जोखीम कमी करण्यासाठी वारंवार एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरणार आहे. नांदेड जिल्हयातील जलशिवाराच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. पाणी आडवा धोरण शेतकऱ्यांनी अंगी करावे. शेतामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा शक्य तिथे वापर करणे हितावह ठरणार आहे.
*पीक संरक्षण व खताचे व्यवस्थापन*
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट राहणार आहे. संभाव्य नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीक संरक्षण व खत व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी खतांचा संतुलित वापर करावा. पावसाचा ताण असताना रासायनिक खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर करू नये. शक्यतो सेंद्रिय खते, कंपोस्ट आणि निंबोळी पेंडीच्या वापर करणे फायदेशीर ठरणार आहे.
खरीप हंगामावर एल निनोचे सावट असल्याने, हवामानाचा अंदाज व कृषी विषयक मार्गदर्शनासाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शेतकरी बांधवांनी घ्यावे असे कृषी विभागाने कळविले आहे.