स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/07/2026 7:48 PM

नांदेड:-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व इतर विविध विभागांमध्ये दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावलेले वरिष्ठ लिपीक पांडुरंग वामनराव पावडे आणि सेवक मोहनदास रोहिदास कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा विद्यापीठातील अधिसभा सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते.
यावेळी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन यांनी निवृत्त होत असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ
आणि समर्पित सेवेचा गौरव करत, विद्यापीठाच्या प्रशासकीय जडणघडणीत त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
वरिष्ठ लिपीक पांडुरंग वामनराव पावडे यांनी विद्यापीठात तब्बल ३० वर्षे, ५ महिने व १४ दिवस सेवा बजावली. त्यांनी १५ जानेवारी १९९६ रोजी सेवक पदावरून सेवेला सुरुवात केली. पुढे २००८ मध्ये कनिष्ठ लिपीक आणि २०१२ मध्ये वरिष्ठ लिपीक म्हणून पदोन्नती मिळवत संगणकशास्त्र संकुल, परीक्षा विभाग आणि दीक्षांत कक्ष अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये जबाबदारी सांभाळली.
सेवक मोहनदास रोहिदास कांबळे यांनी ३० वर्षे, २ महिने व १५ दिवस अविरत सेवा दिली. १५ मार्च १९९६ रोजी सेवक म्हणून रुजू झालेल्या कांबळे यांनी सामाजिकशास्त्र संकुल, संपदा विभाग, विद्यार्थी विकास विभाग, प्रकाशन विभाग, ज्ञानस्रोत केंद्र आणि परीक्षा विभागात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.                                                                                                                                      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. या सोहळ्यास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या