अहिल्यानगर, दि. २ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या हृदयविकाराचे निदान, उपचार व मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे मोफत २डी इको तपासणी व हृदय शस्त्रक्रियेसाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश नरहरी चिवटे शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
शाळा व अंगणवाडी स्तरावरील आरोग्य तपासणीदरम्यान हृदयविकाराची लक्षणे आढळलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल सराफ व डॉ. अभिजित नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २डी इको तपासणी करण्यात येईल.
तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांची वेळेत तपासणी करून नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेवक विक्रम राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), डीईआयसी कक्ष, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील अधिकारी-कर्मचारी तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी समन्वयाने कार्यरत असल्याचेही सांगण्यात आले.