अहिल्यानगर| प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धोंडपारगाव येथील ₹2 लाखांपर्यंत पीककर्ज असलेल्या अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे अद्याप लाभार्थी यादीत समाविष्ट झालेली नसल्याने गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी KYC, आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे सांगितले आहे. मात्र, तरीही अनेकांची नावे यादीत नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
नवीन पीक हंगाम सुरू असताना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज घेण्यात अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे तातडीने जाहीर करून त्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी धोंडपारगाव ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
#Ahilyanagar #Dhondpargaon #LoanWaiver #Farmers #Maharashtra