मराठी ही रोजगाराभिमुख भाषा : राम तरटे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/08/2026 6:30 PM

नांदेड : मराठी भाषा ही केवळ साहित्यापुरती मर्यादित नसून पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, अनुवाद, माध्यम क्षेत्र तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणारी भाषा आहे. त्यामुळे मराठी ही खऱ्या अर्थाने रोजगाराभिमुख भाषा असल्याचे प्रतिपादन पत्रकार तथा प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात आयोजित उद्घोधन वर्गात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
मार्गदर्शन करताना राम तरटे यांनी मराठी विषयातून उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या विविध संधींचा सविस्तर आढावा घेतला. पत्रकारिता, कथालेखन, संपादन, मुद्रितशोधन, आशयलेखन (कंटेंट रायटिंग), अनुवाद आणि माध्यम क्षेत्रात मराठी जाणकारांना मोठी संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांमध्येही मराठी भाषा व साहित्याचा सखोल अभ्यास यशासाठी महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्यासह लेखन, वाचन आणि अभिव्यक्ती क्षमता विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेत 'शिक्षण' आणि 'दीक्षा' या दोन्ही घटकांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, बहुविद्याशाखीय अध्ययन आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील ग्रंथालय, डिजिटल सुविधा आणि ई-बुक्सचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. विभागाचा परिचय डॉ. विश्वधर देशमुख यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. प्रज्ञा इंगोले यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. गोदावरी काननुकले यांनी करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी केले.
चौकट
'बारा आण्याची बोंब' कथाकथनाने सभागृहात हास्यकल्लोळ
पत्रकार तथा कथाकार राम तरटे यांनी सादर केलेल्या 'बारा आण्याची बोंब' या विनोदी कथाकथनाने विद्यार्थी, प्राध्यापक आणि उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः खळखळून हसवले. ग्रामीण जीवनातील खुसखुशीत प्रसंग, बिलोली परिसरातील अस्सल मराठी बोलीभाषेचा सहज वापर आणि प्रभावी निवेदनशैली यामुळे सभागृहात अनेकदा हास्याचे फवारे उडाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या कथाकथनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.

Share

Other News

ताज्या बातम्या