कुपवाड : अकुज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित अकुज इंग्लिश मिडियम स्कूल, कुपवाड येथे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने सुसज्ज रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लॅब तसेच नवीन अत्याधुनिक संगणक लँग्वेज लॅबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन प्रमुख पाहुणे विशाल जगदाळे, साक्षी शहा तसेच श्रीधर काडीमदिवान, उपाध्यक्ष, थिंक प्रो अकॅडमी, बेंगळुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते करण्यात आले.
आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाधारित युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान न देता त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रज्ञानाची आवड, सर्जनशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होणे आवश्यक आहे. या उद्देशाने शाळेने रोबोटिक्स व AI लॅबची निर्मिती केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन तसेच विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष व भारतीय उद्योगरत्न आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ, प्राचार्या कांचन उपाध्ये, उपप्राचार्य उदय कुलकर्णी तसेच पालक प्रतिनिधी सुहास सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांनी लॅबची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स व AI संदर्भातील विविध प्रकल्प व तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे पाहुण्यांनी कौतुक केले.
“भविष्यातील तंत्रज्ञानाच्या जगासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दिशेने रोबोटिक्स व AI लॅब हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अकुज इंग्लिश मिडियम स्कूलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, ‘भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी घडविण्याच्या’ शाळेच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे.