सोलापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर व आर्यमान रायफल शूटिंग क्लब, पिलीव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेत साईप्रसाद आनंदराव ढवळे व श्रीहरी दुंडण्णा कोळी यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर अदिती शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
१४ वर्षे वयोगटात साईप्रसाद ढवळे तर १७ वर्षे वयोगटात श्रीहरी कोळी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या तिन्ही खेळाडूंची पुणे विभागस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना रायफल शूटिंगचे प्रशिक्षक श्री. हरिभाऊ होले सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, पालक व शिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, पुणे विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.