ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आयर्विन पुलाला समांतर नविन पुलामुळे सांगली शहराचे दळणवळण वाढून शहराचे वैभव वाढेल :- पालकमंत्री जयंत पाटील


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/26/2021 10:19:04 PM**     राम मंदिर ते गांधी चौक मिरज रस्त्याचे लवकरच सहापदरीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार
**  सांगली सिव्हील हॉस्पीटल मध्ये नविन 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज येथे 100 खाटांचे 
   एक रूग्णालय, कुपवाड येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल होणार.
** महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक उत्तम व चांगल्या दर्जाचे सोलर सिस्टीम असलेले नाट्यगृह  
   उभारण्यासाठी प्रयत्नशील...

सांगली, दि. 26,
 सांगली शहराचा वाढता विस्तार, शहरीकरण, वाढती वाहतूक तसेच आपत्ती काळात शहराशी तुटणारा संपर्क, तसेच आयर्विन पूलाला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली चार वर्षे या पुलावरून अवजड वाहनांना येण्याजाण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी शहराला जोडणाऱ्या नवीन पुलाची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळेच 25 कोटी रूपये खर्चून कृष्णा नदीवर आयर्विन पूलाला समांतर नविन पूलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे शहराचे बहुतांश प्रश्न सुटून आपत्ती काळातही शहराला तातडीने मदत होईल. त्याचबरोबर सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली येथील आयर्विन पूलाला लागून समांतर पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एस. नलवडे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, समाज कल्याण सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेवक भारती निगडे, उर्मिला बेलवलकर, धीरज सुर्यवंशी, शेखर माने आदि उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या सेवेसाठी गेली 90 वर्षे कार्यरत असणारा आयर्विन पूल हा बांधकाम क्षेत्राचा उत्कृष्ट नमुना असून या पुलाच्या बांधकामाचे स्वरूप अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या पूलाचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन तयार करणारे डिझायनर, या पुलासाठी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्व व्यक्तींची नावे, पुलाच्या खर्चासह फलकावर देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या पुलाचे आयुष्य निर्धारीत करण्यात आले. त्याचप्रमाणे नविन होणारा पूल हा दर्जेदार व देखणा त्याचबरोबर शहराच्या वैभवात भर घालणारा व्हावा. पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आयर्विन पूलाप्रमाणेच या नविन पूलावर सर्व परिपूर्ण माहितीचा फलक लावण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, सांगली शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य शासनाने महापालिकेसाठी 100 कोटी इतका निधी मंजूर केला आहेत. त्यातील 20 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरीत निधीही तातडीने देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. 
सांगली येथील राम मंदिर चौक ते मिरज शहरातील गांधी चौक रस्ता सध्या चौपदरी असून त्याचे लवकरच सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली सिव्हीलमध्ये 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज सिव्हीलमध्ये 100 खाटाचे एक रूग्णालय मंजूर झाले असून ते ही तातडीने उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. यामुळे सांगली सिव्हील मध्ये 800 ते 900 बेड्स उपलब्ध होतील. त्याचबरोबर कुपवाड येथेही मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच कुपवाड शहराची ड्रेनेज योजनाही तातडीने मार्गी लावण्यात येईल. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते त्यामुळे सांगलीत उत्तम व चांगल्या दर्जाचे नाट्यगृह उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. नाट्यगृहाचा सर्वात मोठा खर्च हा वीज बिलाचा असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी या नाट्यगृहावर सोलर सिस्टीम बसविण्याबाबतही विचार करण्यात येईल. आपत्तीच्या काळात सांगली शहराचा पेठ, इस्लामपूर, आष्टा तसेच नजिकच्या नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटतो. हा संपर्क कायम राहण्यासाठी पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग करण्यात आला असून या रस्त्याचेही काम लवकरच सुरू होवून तो ही दर्जेदार निर्माण होईल, असे ते म्हणाले. 
यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता संतोष रोकडे म्हणाले, आयर्विन पूलाला समांतर पूलासाठी 25 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून हा पूल 132 मीटर लांबीचा असून 12 मीटर रूंदीचा आहे. या पुलामध्ये 5 पीअर उभारण्यात येणार आहेत. सांगलीवाडीच्या बाजूस 112 मीटर व सांगलीच्या बाजूस 110 मीटर जोडरस्ते करण्यात येणार आहेत. सदरचा पूल दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज यांनी मानले.
प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगलीवाडी येथे ‍ नविन पूलाच्या कामाचे ‍ भूमिपूजन करण्यात आले. तर सांगली येथील टिळक चौकात कोनशिला अनावरण करण्यात आले. 

Share

Other News