सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक १,२,९,१० मध्ये मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीला लोकांचा आशीर्वाद मिळेल हा मला विश्वास आहे.
शहराचे अनेक प्रश्न पूर्वी अनुत्तरित होते. कुपवाडला पाण्याची व्यवस्था नव्हती. भुयारी गटार नव्हते. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, त्यानंतर विकास कामांचा प्रारंभ झाला. कुपवाड मध्ये १४ पाण्याच्या टाक्या उभारल्या. भुयारी गटार निर्माण केले. गेल्या आठ वर्षात झालेली विकास कामे देखील यांना सुव्यवस्थेत ठेवता आली नाही. आज शहरात नशेचे प्रमाण वाढले आहे. नवीन वर्ष सुरू होताच दोन खून झाले. शहरात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही.
मागील काळात या परिसरातील चैत्रबन नाल्यासाठी मी पालकमंत्री असताना १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु तो नाला स्वच्छ करण्याचे काम देखील यांना करता आले नाही. भाजपच्या काळात या तिन्ही प्रभागात कोणतेही ठोस काम झाले नाही.
मी पालकमंत्री असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नवे कार्यालय पूर्ण झाल आहे. शहरात भव्यदिव्य असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा आपले उमेदवार मनगु आबा सरगर यांच्या माध्यमातून उभा राहिला. भारतीय जनता पक्षाने काय दिले हा प्रश्न निर्माण झाला आहे.
या राज्याची आणि देशाची लोकशाही धोक्यात आली आहे असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही. सुमारे ७० नगरसेवकांचे निकाल बिनविरोध लागले. बिनविरोध होताना उमेदवारांना कोणाची दहशत होती का , भीती होती की काही देवाणघेवाण झाली अशी शंका सर्वसामान्यांना येत आहे. वाम मार्गाने सत्तेत पोहचण्याचा प्रयत्न भाजपा आणि मित्र पक्ष करत असतील तर मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे. निष्ठेचा नवा अर्थ निसटा असा घेऊन अनेक जण पक्ष बदलत आहेत.
ब्रिटीशांना शरण न जाणारे स्व. वसंतराव दादा यांचे हे शहर आहे. ते या कमळाला कसं शरण जाईल? हा विचार ध्यानी असू द्या. सुशिक्षित, अनुभवी उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी रिंगणात उभे केले आहेत. त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहाल, ही खात्री आहे .