नाशिकचे कलावैभव जागतिक स्तरावर नेणाऱ्या मयुरेशला नाशिक मराठी पत्रकार संघाचा ‘कार्यगौरव पुरस्कार–२०२६’ प्रदान
नाशिक: नाशिकच्या चित्रकला क्षेत्रातील प्रतिभेचा डंका जागतिक स्तरावर वाजवणारा युवा चित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव याला नाशिक मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘कार्यगौरव पुरस्कार–२०२६’ आज प्रदान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून देवळाली कॅम्प येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात आयोजित एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. चित्रकलेच्या माध्यमातून नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केल्याबद्दल मयुरेशच्या कर्तृत्वाचा गौरव यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री प्रिया सुरते. स्वाती काळे. अभिनेते स्वानंद बर्वे. अशोक फलदेसाई, कॅन्टोन्मेंट चे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे श्री रतन चावला भगूर नगरपालिकेचे नगरसेवक तथा उद्योजक दीपक बलकवडे नाशिक तालुका पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार ह्या मान्यवरांच्या हस्ते मयुरेशचा सत्कार करण्यात आला, मयुरेशचे गौरवचिन्ह, अधिकृत सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मयुरेशसारख्या युवा आणि प्रयोगशील कलावंताला हा पुरस्कार प्रदान करताना संघाला मनस्वी आनंद होत असून केवळ १५ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले जागतिक यश हे नाशिकच्या शिरपेचातील मानाचा तुरा असून, भविष्यात त्यांच्या हातून अशाच दर्जेदार कलाकृती साकारत राहोत, अशी सदिच्छा यावेळी नाशिक मराठी पत्रकार संघाच्या संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी नाशिक मराठी पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे, मार्गदर्शक नरेंद्र पाटील आणि अध्यक्ष सुनील पवार,कार्याध्यक्ष अरुण बिडवे, सरचिटणीस अरुण तुपे, उपाध्यक्ष प्रविण आडके व दिपक कणसे, खजिनदार वसंत कहांडळ, भास्कर सोनवणे तसेच प्रसिद्धी प्रमुख उमेश देशमुख याची उपस्थिती होती.
मयुरेशची चित्रकलेतील कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी राहिली असून यावर्षी अमेरिकेतील प्रतिष्ठित डेगा इंटरनॅशनल आर्ट असोसिएशन कडून 'विनर डिप्लोमा' प्राप्त झाला असून जागतिक स्तरावरील चित्रकलेच्या कौशल्याचा पुरावा आहे. त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन अमेरिकेतील टेक्सस येथील डेगा आर्ट गॅलरी, श्रीलंकेतील कोलंबो येथे, आणि मुंबईतील प्रसिद्ध नेहरू आर्ट सेंटर यांसारख्या नामवंत ठिकाणी भरवण्यात आले होते. व्यावसायिक पोर्ट्रेट चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रे आज अनेकांच्या घरांची शोभा वाढवत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांनीही त्यांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेतली आहे. यापूर्वी मयुरेशला ‘नाशिक रत्न’, ‘इंडिया क्रिएटिव्ह टेलेण्ट अवॉर्ड’ आणि भारत सरकारच्या एजन्सीद्वारे दिला जाणारा ‘माणुसकी सेवा गौरव पुरस्कार’ यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्याने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या अष्टपैलू कौशल्याची मोहोर उमटवली आहे.
यावेळी प्रिंट मिडियाचे-१३, इलेक्ट्रॉनिक मिडिया-२, वृत्तपत्र विक्रेते-२, क्रिडा-४, उद्योजक-३ धार्मिक-२, शैक्षणिक-७, कृषि-३, सांस्कृतिक-३, सामाजिक-२, शौर्य-१, सहकार-२ अशा ४३ जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, कलावंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानाबद्दल कला, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून मयुरेश आढाव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.