कायदा व सुव्यवस्था, मतदान व मतमोजणीच्या दृष्टीने मुख्य निवडणूक निरीक्षकांनी महापालिकेत घेतली आढावा बैठक

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/01/2026 6:22 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी *मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर* यांनी सोमवारी महापालिकेस भेट दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व काटेकोर पध्दतीने पार पाडण्यासाठी त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी *पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार* व *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिका मुख्यालयात मुख्य निवडणूक निरीक्षकांना निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीस *उपायुक्त नितीन गाढवे* यांनी निवडणूक कामकाज तसेच आर्जपर्यंत केलेल्या कार्यवाही बाबतची माहिती सादर केली. ज्यामध्ये छाननीची प्रक्रिया पार पडलेली असुन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुध्दा सुरळीतपणे पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक लाढविणाऱ्या उमेदवारांचा तपशील, मतपत्रिका छपाई,मतदान यंत्रे, मतदान यंत्रे तयार करणे, स्ट्राँग रुम व्यवस्था,क्षेत्रिय अधिकारी नियुक्ती, मतदान केंद्रांचा तपशील, मतदान व मतमोजणी प्रशिक्षण, टपाली मतदान,मतदान साहित्य व वितरण,वाहतुक व्यवस्थापन, मतमोजणी,मतदार जनजागृती अभियान,आचारसंहिता अंमबजावणी,तक्रार निवारण कक्ष व एक खिडकी कक्ष इत्यादी बाबतच्या माहितीचे सादरीकरण मुख्य निवडणूक निरीक्षका समोर करण्यात आले. 

निवडणूक प्रक्रिया सुरळीत राबविण्याच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षकांनी काही आवश्यक त्या सूचना बैठकीत दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, कर्मचाऱ्यांना योग्यरित्या प्रशिक्षण देणे, EVM तयार करतांना योग्य ती दक्षता घेणे, दारु, पैसे इत्यादी अमिषांचा वापर होणार नाही याची काळजी घेणे, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता, अचूकता व सुरक्षेचे सर्व निकष पाळले जात असल्याची खात्री करणे, निवडणुकीदरम्यान अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी महामार्गावरील तपासणी नाक्यांवर कडक वाहन तपासणी करण्याच्या इत्यादी महत्वाच्या सूचना निवडणूक निरीक्षकांनी केल्या. तसेच शहरातील संवेदनशील भागांची माहिती पोलीस प्रशासनाकडून घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत पोलीस विभागाच्या वतीने *पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार* यांनी केलेल्या कार्यवाहीचा तपशील मुख्य निडणूक निरीक्षकांपुढे ठेवला. त्यात प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जवळपास ६०० व्यक्तींना हद्दपार करण्यात आले असुन ३३० व्यक्तींना नॉन-बेलेबल वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे अवैध मद्यसाठा / मद्यविक्री संदर्भात एकुण १७ गुन्हे दाखल करण्यासह अवैद्य शस्त्रास्त्र बाळगणे प्रकरणी ०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संवेदनशील / अतिसंवदेनशील असलेल्या २१ मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त व रा.रा.पो.बलाचे जवान तैनात करण्यासह स्ट्राँग रुम व मतमोजणी केंद्रावर आवश्यक तो बंदोबस्त करण्यात येणार असुन पोलीस मुख्यालयात २४x७ नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आल्याचे यावेळी पोलीस अधिक्षकांनी सांगितले.

*चौकट*
*वेब कास्टींगसह CCTV ची राहणार करडी नजर*
एकुण मतदान केंद्रापैकी २४७ मतदान केंद्रे ही परदानशिन असुन या सर्व मतदान केंद्रांवर अतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असुन परदानशीन मतदान केंद्रावर परदानशीन मतदारांची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या तसेच आर्थिक बाबींच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ७० अशी असुन या मतदान केंद्रांवर Web Casting ची व्यवस्था करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ६ किंवा ६ पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या एकुण १४ इमारतीमधील ८८ बूथवर CCTV कॅमरे बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी *मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.महेशकुमार डोइफोडे* यांनी स्पष्ट केले. या बैठकीस सर्व अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी व पालिकेचे इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. 

Share

Other News

ताज्या बातम्या