सांगली : सोलापूर सह मराठवाडा आणि विदर्भात आलेल्या अवकाळी आणि महापुराच्या संकटात आपला खारीचा वाटा उचलावा म्हणून सांगलीतील हळद मिलमध्ये काम करणाऱ्या हमाल आणि महिला कामगारांनी एकत्र येत आपली मदत सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे सुपूर्द केली आहे.
हळद कामगारांचे नेते बजरंग खुटाळे यांच्या पुढाकाराने आणि हमालपंचायतीचे राज्याचे नेते विकास मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्रीकृष्ण मिल मध्ये काम करणाऱ्या आणि स्वतः पूरग्रस्त असणाऱ्या हळद मिल मधील महिलांनी व हमालांनी आपल्या पगारातील रक्कम बाजूला काढून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थी आणि कुटुंबांना मदत जमवली आहे. त्यातून त्यांनी वह्या, शैक्षणिक साहित्य, तेल, चहा पावडर, आगपेटी, कोलगेट पासून सतरंजी, चटई, ब्लॅंकेट असे साहित्य देऊ केले आहे.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडे या महिलांनी ही मदत सुपूर्द करून पूरग्रस्तांच्या पाठीशी आमच्याही सदभावना आहेत. हा प्रसंग आमच्यावर ओढवला तेव्हा महाराष्ट्रातून मदत आली. आता आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत असा निरोप दिला. एकूणच हा समारंभ भावपूर्ण असा होता. आम्ही सर्वच पत्रकार भावनिक झालो.स्वतःचे आयुष्य खडतर आणि कष्टाचे असतानाही या मंडळींनी आपली दानत आणि वैचारिकता कृतीतून दाखवून दिली आहे. त्यांना मदतीसाठी उद्युक्त करणाऱ्या बजरंग खुटाळे यांनी प्रत्येक वर्षी गरीब विद्यार्थ्यांना मदत करून अनेक शासकीय अधिकारी घडवले. आताही तुमची मदत योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पत्रकार पोहोचतील असे गौरवोद्गार यावेळी शिवराज काटकर, चंद्रकांत क्षीरसागर, तानाजीराजे जाधव, अभिजीत शिंदे, रविकुमार हजारे आणि सचिन ठाणेकर यांनी काढून त्यांच्या सदभावनेबद्दल आभार व्यक्त केले.
यांनी केली मदत -
बजरंग नामदेव खुटाळे माथाडी कामगार पतपेढी संचालक व हळद विभाग प्रमुख, सुरेश पंडित होनमाने, सिध्दू यमगर, राणी आडमुठे, सुरेखा धेंडे, चंदाबाई सोलनकर, सुमन माने, कमल कोळेकर, शालन जगताप, सुरेखा कोळपे, राजक्का कोळपे, माया बजबळे, वंदना दुधाळ, शोभा दुधाळ, लक्ष्मी यमगर, शांता गलांडे, आयुब बेलिफ, लक्ष्मी हवालदार.