पंढरपूर-
पंढरपूर महिला मंडळ संचलित ,महिला मंडळ प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरा झाला. यात विविध उपक्रम आणि वैज्ञानिक प्रयोग यांची भरपूर रेलचेल होती .
या सुंदर आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे उदघाटन पंढरपूर शहराच्या नगराध्यक्षा डॉ .सौ. प्रणिता ताई भालके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विविध दालनांची पाहणी करून अतिशय समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी साजरा केलेल्या पोवाड्याचे आणि त्यांनी सांगितलेल्या मराठी भाषेची माहिती यांचेही विशेष कौतुक केले .
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त शाळेत विविध नाविन्यपूर्ण दालने तयार करण्यात आली .यानिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा व संस्कृतीचा गौरव करणारे असे प्रत्येक दालन तयार करण्यात आले होते. यात मराठी पुस्तक दालन ,मुक्त व्यासपीठ दालन, लोककला दालन, सांस्कृतिक दालन ,मराठी रंगोत्सव दालन अशा प्रकारची विविध स्वतंत्र दालने तयार करण्यात आली होती.
प्रत्येक दालनात नावाप्रमाणे विविध साहित्य तयार करून आकर्षक मांडणी करण्यात आली .यात हस्तलिखित, सुलेखन, कविता ,चित्र, मराठी साहित्यात असणारा अनमोल ठेवा म्हणी ,वाक्प्रचार सुविचार ,कोडे, विविध नामांकित लेखकांची पुस्तके, त्यांचे विचार, तसेच अ ते ज्ञ पर्यंतची वर्णमाला विद्यार्थ्यांना काय शिकवते या आशयाची पूर्ण वर्णमाला तयार करण्यात आली होती. तसेच संस्कृतीचे जिवंत चित्रण तसेच मराठीचा सांस्कृतिक ठेवा इत्यादी भरपूर असे मराठी भाषेविषयी प्रेम आणि अभिमानी व्यक्त करणारे साहित्य यात होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध शैक्षणिक, वैज्ञानिक प्रयोगाचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखवले. त्यात वॉटर एटीएम, सूक्ष्मदर्शक, तरंग लहरी, दाब व त्याचे परिणाम ,अग्निबाण ,जीवसृष्टी, ज्वालामुखी, पाण्याचा दाब, हवेचा दाब ,पाण्याची क्षारता, घनता, जलशुद्धीकरण इत्यादी प्रयोगाची विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केले.
तसेच क्षेत्रभेटी अंतर्गत पंढरपूर कार्यक्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती विद्यार्थ्यांनी घेतल्या होत्या त्याही या निमित्ताने प्रोजेक्टवर दाखवण्यात आल्या .
दुपारच्या सत्रात पंढरपूर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब आणि केंद्र समन्वयक श्री बोडरे सर यांनीही भेट दिली. चव्हाण साहेबांनी सर्व दालनांची पाणी करून दालनाची आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाचे विशेष कौतुक करत विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. मेधा ताई दाते मॅडम , सचिव डॉ वर्षा काणे मॅडम, भाटे मॅडम आंधळगावकर मॅडम , अरुणा काणे मॅडम ,माजी मुख्याध्यापिका पाटील मॅडम, सुपेकर मॅडम, माजी विद्यार्थिनी गोमे मॅडम, तसेच संस्थेच्या विविध मान्यवर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम पाहून त्यांनीही समाधान व्यक्त केले.
हे सर्व उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.