दिनांक: ११,
दिवाळीपूर्वी बाजारपेठांत सुव्यवस्थेसाठी मनपाची कठोर कारवाई! अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
आयुक्तांचा स्पष्ट आदेश: अतिक्रमणे हटवा, अन्यथा थेट कायदेशीर कारवाई
सांगली: दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन, महानगरपालिका प्रशासनाने आज अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम तीव्र केली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. सत्यम गांधी यांच्या थेट आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली.
आज सांगली मारुती रोड ते आरवडे हायस्कूल परिसरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर झालेले अतिक्रमण हटवण्यात आले.
👉 कारवाई आणि गुन्हा दाखल:
कारवाईदरम्यान, ठोंबरे चिरमुरे स्टोअर दुकानासमोर विनापरवाना आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक जागेवर घालण्यात आलेला मंडप अतिक्रमण विभागाने तत्काळ काढून टाकला. यावेळी काही दुकानदारांनी स्वतःहून रस्त्यावरील अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य केले.
दरम्यान, कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यामुळे, संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालून दमदाटी केल्याबद्दल श्री. ठोंबरे यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉 आयुक्तांचा कठोर इशारा आणि विक्रीसाठी पर्यायी जागा:
मा. आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, दुकानासमोर केवळ दहा फुटांपर्यंतच मंडप घालण्याची परवानगी आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढे कडक दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल.
दिवाळी सणाच्या साहित्याच्या किरकोळ विक्रेत्यांसाठी विशेष सूचना:
1. विक्रीसाठी तरुण भारत स्टेडियम, शिवनेरी हॉटेल ते आनंद टॉकीज मार्गे आरवाडे हायस्कूल, कृष्णामाई घाट या रोडवर सोय करण्यात आलेली आहे. विक्रेत्यांनी तेथेच बसून आपली विक्री करावी.
2. दत्तमारुती रोड ते बालाजी चौकापर्यंत मध्यभागी बसून कोणीही विक्री करू नये. सदरचा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा ठेवावा.
3. रस्त्यावरील पट्ट्याच्या बाहेर कोणीही विक्रीसाठी टेबल, मंडप घालू नये किंवा साहित्य, सामान ठेवू नये. अन्यथा ते जप्त करण्यात येईल. रस्त्यावरील पट्ट्याच्या बाहेर विनापरवाना लावलेले मंडप काढण्यात येतील याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. १) श्री. आकाश डोईफोडे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर, उप अभियंता श्री. महेश मदने, कनिष्ठ अभियंता श्री. ऋतुराज यादव, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, बांधकाम पर्यवेक्षक श्री. वादवणे, अतिक्रमण अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त (क्षेत्रीय कार्यालय क्र. २) श्री. नागार्जुन मद्रासी, तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.