सांगली प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांसाठी बागबगीच्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु या बागांची दुरुस्ती आणि देखभाल व्यवस्थितपणे होत नसल्याचे दिसत आहे. कारण सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या त्रिकोणी बागेमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कचऱ्याचा भला मोठा ढीग पाहायला मिळत आहे. त्रिकोणी बागेतला कचरा गोळा करून तो गेट जवळच लावलेला आहे,परंतु त्या कचऱ्याचा उठाव झालेला नसल्याने, ही त्रिकोणी बाग आहे की, महापालिकेचा कचरा डेपो असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याआधीही अनेक सोयीसुविधांबाबत लोकहित मंचने आवाज उठवला आहे.
या बागेमध्ये सकाळी सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बाग स्वच्छ केल्यानंतर जमा होणारा कचरा ताबडतोब आरोग्य विभागाने उचलणे गरजेचे असतानाही तो तसाच पडलेला आहे. याकडे महानगरपालिका उद्यान अधीक्षकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर कचऱ्यावर मोकाट कुत्री बसून तो पुन्हा विस्कटण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कचरा महापालिकेने उचलावा अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तो महापालिका कार्यालयासमोर आणून टाकला जाईल अशा तऱ्हेचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय.