स्वारातीम विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन कार्यशाळा संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/12/2025 8:28 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवी वर्षानिमित्त एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी व समन्वयकांसाठी ‘एकात्म मानव दर्शन’ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यशाळा बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रकाश पाठक (धुळे) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. अशोक महाजन यांनी एकात्म मानव दर्शन ही केवळ तत्त्वज्ञानाची संकल्पना नसून, आजच्या स्पर्धात्मक व भौतिकतावादी युगात मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक अशी जीवनदृष्टी असल्याचे प्रतिपादन केले. व्यक्ती, समाज, राष्ट्र व निसर्ग यांचा समतोल साधणारी ही विचारधारा युवकांमध्ये मूल्याधिष्ठित नेतृत्व निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे प्रा. प्रकाश पाठक यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना सांगितले की, भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित एकात्म मानव दर्शन हे पाश्चात्य भांडवलशाही व साम्यवादी विचारसरणीला पर्याय देणारे मौलिक चिंतन आहे. शिक्षण, सेवा व सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून या विचारांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उद्घाटनानंतरच्या पहिल्या सत्रात ‘एकात्म मानव दर्शन’ या विषयावर प्रा. सुहास क्षीरसागर (पुणे) यांनी सविस्तर व्याख्यान दिले. मानव हा केवळ भौतिक गरजांपुरता मर्यादित नसून त्याचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक असे चारही आयाम संतुलित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील विषमता, नैतिक अधःपतन व पर्यावरणीय संकटांवर एकात्म मानव दर्शन प्रभावी उत्तर देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसऱ्या सत्रात ‘मी, माझा देश, माझा समाज’ या विषयावर श्री. अमित कुलकर्णी (पुणे) यांनी मार्गदर्शन केले. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व व स्वयंशिस्त निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी’ पासून ‘आम्ही’ आणि पुढे ‘राष्ट्र’ असा मूल्याधारित प्रवास घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, अधिसभा सदस्य युवराज पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारुती गायकवाड, शिक्षणशास्त्र संकुल संचालक डॉ. वैजयंता पाटील तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय हीरक महोत्सवी वर्ष समितीचे समन्वयक प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक महाजन होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य डॉ. केशव आलगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैजयंता पाटील यांनी मानले. या कार्यशाळेमुळे एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी व समन्वयकांना एकात्म मानव दर्शनाच्या तत्त्वज्ञानाची सखोल समज प्राप्त होऊन समाजोपयोगी उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Other News

ताज्या बातम्या