श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत शंकरपट स्पर्धेचा थरार; ३८ बैलजोड्यांचा सहभाग

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/12/2025 8:30 PM

नांदेड - दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आज पारंपरिक शंकरपट (बैलजोडी बैलगाडी शर्यत) स्पर्धा उत्साहात पार पडली. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या एकूण ३८ बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत माळेगावच्या माळरानावर प्रचंड थरार निर्माण केला. स्पर्धा पाहण्यासाठी भाविक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
     या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उपअभियंता राठोड, दिनेश महेर, चंद्रकांत जाधव, संजय नीलपत्रेवार, आईलाने, चव्हाण, नायब तहसीलदार मेकाले आदी मान्यवर उपस्थित होते.
    स्पर्धेदरम्यान वेगवान, शिस्तबद्ध आणि ताकदवान बैलजोड्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक फेरीदरम्यान टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या आणि जल्लोषात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा शेतकरी जीवनशैलीचे जिवंत दर्शन घडविणारी ठरली.
      या स्पर्धेत कोंडीबा मोहन कोरडे यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. अवघ्या ४ सेकंद ३९ पॉईंटमध्ये त्यांनी शर्यत पूर्ण करत बाजी मारली. अमोल देविदास राठोड यांनी ४ सेकंद ४२ पॉईंटमध्ये धाव घेत द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अश्विनी दिलीपराव मंदाडे आणि बालाजी माणिकराव कदम यांना विभागून देण्यात आले. या दोन्ही बैलजोडींनी ४ सेकंद ४३ पॉईंटमध्ये शर्यत पूर्ण केली.
      प्रथम क्रमांकास ६१ हजार ५१ रुपये, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये व तृतीय क्रमांकास ४१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्रासह पारितोषिके उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सर्व सहभागी बैलजोडी मालकांना प्रोत्साहनपर मानधन देण्यात आले.
     यावेळी उपस्थित मान्यवरांनी शंकरपटसारख्या पारंपरिक क्रीडा प्रकारांमुळे ग्रामीण संस्कृती जिवंत राहते. शेतकरी आणि बैलगाडीप्रेमींसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून परंपरा, मेहनत आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव असल्याचे मत प्रवीण पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या