अहिल्यानगर, दि. ६ : "महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्त्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच साहाय्यभूत ठरतील," असे प्रतिपादन मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने यांनी केले.
महिला व नवमतदार यांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मनपा स्वीप समितीच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवावयाच्या विविध उपक्रमांचा आराखडा व अहवाल, मुख्य निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या माध्यमातून नुकताच निवडणूक निरीक्षकांना सादर करण्यात आला. मतदारांचे नियोजनबद्ध शिक्षण आणि निवडणूक सहभागावर आधारित विविध उपक्रमांचा यात समावेश आहे. यावेळी पथकातील अतिरिक्त जिल्हाधिकारी (जळगाव) श्रीमंत हरकर व स्वीप समिती सदस्य उपस्थित होते.
"लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून, निर्भयपणे व निरपेक्ष वृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करतील," असा विश्वास श्रीमंत हरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वीप आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये मतदार जनजागृतीसाठी रॅली, शोभायात्रा, मिरवणूक, सेल्फी पॉइंट, पथनाट्य, विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच नवमतदार जागृती, दिव्यांग, तृतीयपंथी व वंचित घटकातील महिलावर्गासाठी विशेष उपक्रम, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयक जनजागृती शिबिरे, मतदार जनजागृती शपथ, संकल्पपत्र, बाईक रॅली, दृकश्राव्य निर्मिती, समाजमाध्यमांचा वापर, 'आयुक्तांशी संवाद', मनपा दौड आणि मतदार जागृतीचे हळदीकुंकू आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
#अहिल्यानगर #मतदानजागृती #लोकशाहीचाउत्सव #महानगरपालिकानिवडणूक #निवडणूक२०२६ #स्वीप #मतदारराजाजागाहो #माझेमतमाझाअधिकार #नवमतदार #लोकशाही #मतदानकरा #Ahilyanagar #VoterAwareness #SVEEP #Election2026 #Democracy #CastYourVote #EveryVoteCounts #MuncipalElection #MaharashtraElections