नांदेड : गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात शालेय स्तरावर विविध स्पर्धाच्या माध्यमांतून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व तसेच हिंद दी चादर या विषयावरील डॉक्युमेंट्री, चित्रपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या अनुषंगाने लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच चित्रफित दाखविण्यात आली.
कंधार तालुक्यातील फुलवळ केंद्रांतर्गत असलेल्या जि. प. शाळेत चित्रकला व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर व जि.प. प्राथमिक शाळा रहाटी बु. येथे “हिंद दी चादर” ही माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. जि.प. केंद्र प्राथमिक शाळा चिखली, जि.प. केंद्र प्राथमिक शाळा कौठा व जि.प. कन्या शाळा कौठा (ता. कंधार) येथील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली.
जि.प. नवीवाडी, जि.प. प्राथमिक शाळा बळीरामपूर (केंद्र वसरणी), जि.प. प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा तसेच जिल्हा परिषद हायस्कूल भायेगाव येथे हिंद दी चादर गीत व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी येथे हिंद दी चादर गीत व कथा सादरीकरण टीव्हीच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद नागापूर व जि.प. प्राथमिक शाळा तुप्पा येथे विद्यार्थ्यांना हिंद दी चादर चित्रपट दाखविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर”
तालुकास्तरीय स्पर्धा (१५ ते १७ जानेवारी २०२६) चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा ई.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक : २० जानेवारी २०२६
ठिकाण : गुरु ग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेड
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीद्वारे आजपासून जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.