कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा - पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 15/01/2026 9:42 PM



​शिर्डी, दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी कृषी विभागाने योजनांची जनजागृती थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

​राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, रामपूरवाडी, आडगाव, नांदूर, शिर्डी व पुणतांबा अशा गावांमधील ११ शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 'कम्बाईन हार्वेस्टर'साठी निवड झाली आहे. या मंजूर हार्वेस्टरचे वितरण पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यातील कृषी यांत्रिकीकरणाच्या सद्यस्थितीची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले , या योजनेसाठी तालुक्यातील १३ हजार २४१ शेतकऱ्यांची निवड झाली आहे. आतापर्यंत २२५ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा लाभ घेतला असून, त्यासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. तसेच, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी ७१४ शेतकऱ्यांची निवड झाली असून, यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
​प्रयोगशील शेतीला बळ देणार
कृषी विकासाला गती देताना नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. शिर्डी व राहाता परिसरातील शेतकरी प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून प्रगती करत आहेत. या प्रयत्नांना शासकीय योजनांचे भक्कम पाठबळ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने केवळ गावातच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचून काम करावे, असे निर्देश डॉ. विखे पाटील यांनी दिले.

​यावेळी 
राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मंडल अधिकारी रमेश चोपडे, अभय बोरसे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

******

Share

Other News

ताज्या बातम्या