योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र प्रचार कक्ष आवश्यक - अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/01/2026 7:03 PM

नांदेड :- अनेक शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत अपुरी किंवा ओझरती पोहोचते. त्यामुळे योजनांची सविस्तर, एकत्रित व सहज उपलब्ध माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र प्रचार-प्रसिद्धी कक्ष असणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांचा सहभाग वाढून योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले.
     मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध पाणी व स्वच्छता विषयक योजनांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने नांदेड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत प्रचार-प्रसिद्धी कक्ष व वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉर रूमचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक मयूर आंदेलवाड, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ग्रामीण पाणीपुरवठा विभागात स्थापन करण्यात आलेल्या या वॉर रूममध्ये वॉटर बजेटिंग, सौर ऊर्जा वापर, शुद्ध पाणीपुरवठा, विहीर पुनर्भरण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, प्लास्टिक बंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचरा कुंडीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन तसेच सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांजवळ शोषखड्डे करण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील माहितीपर पोस्टर्सही या कक्षात लावण्यात आले आहेत.
      मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पाणी व स्वच्छता विषयक कामांसाठी स्वतंत्र गुणांकन देण्यात आले आहे. ग्रामपातळीवर या अनुषंगाने प्रभावी कामे करून ग्रामपंचायतींना पूर्ण गुण मिळावेत, या उद्देशाने या प्रचार-प्रसिद्धी कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक मयूर आंदेलवाड व कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी सांगितले. या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, उप अभियंता एस.एस. देशमुख, अधिक्षक रविन रेड्डी,  माहिती-शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल रोकडे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार कपेंद्र देसाई, मिनान, गट समन्वयक दत्तात्रेय इंदुरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, पाटोदकर यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या