150 दिवसीय ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम;नांदेड परिक्षेत्र कार्यालय राज्यात प्रथम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/01/2026 7:59 PM

नांदेड :- मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मुल्यमापनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यापूर्वी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यात देखील नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.

दिनांक 7 मे, 2025 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन सुधारणा घडवून आणण्यासाठी 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते. तद्नंतर, दिनांक 01 ऑक्टोबर, 2025 रोजी या कार्यक्रमास दिनांक 10 जानेवारी, 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ दिली होती.

सदर कार्यक्रमांतर्गत प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित व्हावे या उद्देशाने विविध स्तरांवर व्यापक सुधारणा अपेक्षिल्या होत्या. यामध्ये संकेतस्थळ सुधारणा, आपले सरकार पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, व्हॉट्सअॅपद्वारे सेवा वितरण तसेच नाविन्यपूर्ण वेब अॅप्लिकेशन या विषयांवर विशेष भर देण्यात आला होता.

त्यानुसार, नांदेड पोलीस परिक्षेत्राचे संकेतस्थळ नव्याने बनविण्यात आले असून ते अधिक सुरक्षित व नागरिकाभिमुख करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संकेतस्थळावर विविध शासकीय योजना व सेवांचे एकत्रीकरणही करण्यात आले आहे. आपले सरकार पोर्टल अंतर्गत तक्रारींचे वेळेत निवारण, ई-ऑफिस प्रणालीद्वारे कागदविरहित व जलद फाईल निपटारा, तसेच इंटरॅक्टिव्ह डेटा डॅशबोर्डद्वारे अचूक व अद्ययावत माहिती सादरीकरण यामुळे प्रशासकीय निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी झाली आहे. त्याचपमाणे, सेवा वितरणासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करून अंतर्गत समन्वय अधिक बळकट करण्यात आला आहे.

याशिवाय परिक्षेत्रातील अर्ज चौकशीच्या कामकाजासाठी 'संवेदना' ही AI आधारित संगणकीय कार्यप्रणाली विकसित करण्यात आली असून त्याचा प्रभावीपणे वापर सुरु करण्यात आला आहे. सदर प्रणालीव्दारे अर्ज चौकशी पूर्ण केलेल्या प्रकरणांच्या अनुषंगाने तक्रारदारास सदर तक्रारीवर मत मांडण्यासाठी Feedback सुविधा देण्यात आली असून पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयात Feedback सेल देखील सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, नांदेड परिक्षेत्रातातील गुन्हयांच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी Eagle Eye: Crime Investigation monitoring ही प्रणालीसुध्दा सुरु करण्यात आली असून उपरोक्त बाबींसोबतच नांदेड परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी हेल्पलाइन 'खबर' ची सुरुवात करण्यात आली आहे. 91 50 100 100 असा सदर हेल्पलाइनचा क्रमांक आहे. सदर हेल्पलाइनवर नागरिकांना त्यांच्या भागातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांची माहिती सुलभपणे देणे सोईस्कर झाले आहे. सदर हेल्पलाईन क्रमांकावर व्हॉटस्अॅप सेवा कार्यान्वित करण्यात आली असून, नागरीकांनी केलेल्या तक्रारींवर पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देखील सदर क्रमांकावरुन त्यांना देण्यात येते. पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या उपरोक्त कामकाजाची भारतीय गुणवत्ता परिषदेने दखल घेतली आहे.

150 दिवसांच्या सदर कार्यक्रमाची मुदत दिनांक 10 जानेवारी, 2026 रोजी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथमतः पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन, त्यातून (4) परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक कार्यालयांची निवड करण्यात आली होती. यात, नांदेड परिक्षेत्रीय कार्यालयाची देखील निवड करण्यात आली होती. त्यानंतर परिक्षेत्र कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांनी केले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या