अहिल्यानगर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकास धमकावून खंडणी उकळणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजता निंबळक एमआयडीसी, प्लॉट क्रमांक 07 व 08 येथील सुयश मेटल प्रोसेसिंग्स प्रा. लि. या कंपनीत अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व इतर चार अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करून काम बंद पाडले तसेच काम सुरू ठेवायचे असल्यास दरमहा एक लाख रुपये देण्याची मागणी केली. यावेळी धमकावून 20 हजार रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच कामगारांना संबंधित संघटनेस मान्यता देण्यासाठी चिथावणी दिल्याचेही समोर आले आहे.
घटनेनंतर संबंधित उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 118/2026 नोंद करून भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस नोंदीनुसार आरोपीवर यापूर्वी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांत खून, मारहाण, सरकारी कामात अडथळा, शस्त्र कायदा आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कामगारांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही त्रास देत असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून संरक्षण दिले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.