विकसित भारत बिल्डथॉनमध्ये चौफाळा शाळेच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची निवड कृत्रिम बुद्धिमत्ता स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप;सीईओ मेघना कावली यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत केले मार्गदर्शन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/06/2026 4:40 PM

नांदेड - विकसित भारत बिल्डथॉन २०२५ या देशपातळीवरील नवसंशोधन स्पर्धेत निवड झालेल्या जिल्हा परिषद हायस्कूल, चौफाळा येथील विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांची भेट घेऊन आपल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली मेघना कावली यांची फायबर-रेझिन प्रतिकृती त्यांना भेट म्हणून प्रदान केली.
     शालेय स्तरावरील नवसंशोधकांचा शोध घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत बिल्डथॉन २०२५ या स्पर्धेत चौफाळा शाळेच्या स्मार्ट ब्रिज सेफ्टी अलार्म सिस्टीम या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची देशपातळीवर निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातून सादर झालेल्या हजारो प्रस्तावांमधून निवड झालेल्या ९३२ कल्पना आणि प्रारूप नमुन्यांमध्ये या प्रकल्पाचा एकमेव समावेश आहे. या यशस्वी प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांच्या गटाला प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले असून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
    या स्पर्धेत अनेक नामांकित खाजगी शाळांनी सहभाग नोंदविला होता. यातून नांदेडच्‍या चौफाळा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्‍या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण प्रकल्पाने आपली वेगळी छाप पाडत राष्ट्रीय स्तरावरील निवड मिळवली. त्यामुळे खाजगी शाळांनाही मागे टाकत जिल्हा परिषद शाळेने आपल्या गुणवत्ता, संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांच्या जोरावर अव्वल स्थान सिद्ध केले आहे.
    विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या प्रकल्पामध्ये पुलावरून वाहने खाली कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी तांत्रिक उपाय सुचविण्यात आला आहे. शाळेच्या 4S क्रिएटर्स या बालवैज्ञानिक गटाने हा प्रकल्प विकसित केला आहे. या गटात इयत्ता नववीतील शुभम संतोष मानेकर, साईराज राजेश लांडगे, शादुल्ला खय्युम शहा व श्रीजय संजय कुळदेवकर यांचा समावेश असून त्यांना विज्ञान शिक्षक उमाकांत डिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
     मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही मोठी संशोधन क्षमता असल्याचे सांगितले. योग्य मार्गदर्शन, जिज्ञासा आणि परिश्रम यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती, जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
     यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, विज्ञान शिक्षक रवी पांचाळ, आयटीसी लॅब प्रमुख उमाकांत परळीकर, धनंजय गुम्मलवार आदी उपस्थित होते. या यशामुळे चौफाळा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि नावीन्यपूर्ण संशोधन क्षमतेला नवी ओळख मिळाली असून जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या