नांदेड:-भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना,महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती, महाराष्ट्र राज्याचे सदस्य देविदास हादवे (वसमत-नांदेड) यांना समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार – २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.
अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने आयोजित या पुरस्कारासाठी देविदास हादवे यांची निवड भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्याची दखल घेऊन करण्यात आली. समाजातील वंचित, भटके व विमुक्त बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत.
देविदास हादवे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे, भटक्या-विमुक्त समाजासाठी विशेष शिबिरांचे आयोजन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, नागरिकांना स्थायिक करण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून समाजामध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि. २६ जून २०२६ रोजी सिडको, नांदेड येथील कामगार भवनात आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना 'छत्रराजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार – २०२६' प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर देविदास हादवे यांनी हा सन्मान संपूर्ण भटक्या-विमुक्त समाजाला समर्पित करत, भविष्यातही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी आणि समाजाच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करत राहणार असल्याची भावना व्यक्त केली.
या पुरस्काराबद्दल विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व भटक्या-विमुक्त समाजातील मान्यवरांनी देविदास हादवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.