शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि विकासाचा दूरदर्शी शिल्पकार : मा.डी.पी.सावंत साहेब

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/07/2026 12:35 PM

"शिक्षणाने माणूस घडतो, संस्काराने समाज घडतो आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाने इतिहास घडतो." या विचारांचा प्रत्यय ज्यांच्या कार्यातून वारंवार येतो, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकुशल सचिव आणि शिक्षण, समाजकारण, क्रीडा व विकास या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे मा. डी. पी. सावंत साहेब.
      मा. डी. पी. सावंत साहेब यांचे संपूर्ण जीवन हे समाजहित, शिक्षण, विकास आणि जनसेवा यांना समर्पित आहे. त्यांनी कोणतेही पद केवळ अधिकार म्हणून न स्वीकारता ते समाजसेवेचे माध्यम मानले. म्हणूनच त्यांच्या कार्याचा प्रभाव आज हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात स्पष्टपणे दिसून येतो.
     श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. संस्थेच्या उपाध्यक्षा मा. सौ. अमिताभाभी अशोकराव चव्हाण मॅडम तसेच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार ॲड. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण मॅडम या संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या सक्षम नेतृत्वासोबत संस्थेचे कार्यकुशल सचिव म्हणून मा. डी. पी. सावंत साहेबांनी आधुनिक शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि विद्यार्थीहिताच्या अनेक उपक्रमांना गती दिली.
    त्यांचा ठाम विश्वास आहे की शिक्षण ही समाजपरिवर्तनाची सर्वात प्रभावी शक्ती आहे. म्हणूनच त्यांनी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणावर विशेष भर दिला. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण न करता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवावा, अशी त्यांची भूमिका राहिली आहे.
     नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात त्यांनी घडविलेली क्रांती विशेष उल्लेखनीय आहे. एकेकाळी गुणवंत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लातूरकडे जात असत. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य आणि बुद्धिजीवी यांच्यासोबत व्यापक विचारमंथन केले. त्यातून जीनियस बॅच, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक सुविधा आणि आधुनिक अध्यापन पद्धती विकसित करण्यात आल्या. परिणामी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवून जिल्ह्याची स्वतंत्र शैक्षणिक ओळख निर्माण केली.
     शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीही मा. डी. पी. सावंत साहेबांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ पुस्तकांमधून होत नाही, तर क्रीडा, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण यांच्या विकासातूनही घडतो, हा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे त्यांनी नांदेड जिल्ह्यात विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. या स्पर्धांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील असंख्य खेळाडूंना आपल्या गुणवत्तेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. अनेक खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे नांदेड जिल्ह्यात समृद्ध क्रीडा संस्कृती विकसित झाली, क्रीडेला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आणि जिल्ह्यातील युवकांमध्ये आरोग्यदायी, शिस्तबद्ध आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले.
    राजकारणात त्यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. नांदेड उत्तर मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी लोकहिताची अनेक ऐतिहासिक कामे केली. नांदेड शहराला भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजना साकारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वाडी बुद्रुक येथे मराठवाड्यातील पहिली निमशहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला. या योजनांमुळे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला.
    त्यांनी मतदारसंघात रस्त्यांचे विस्तृत जाळे उभारले, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अत्याधुनिक इमारती, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक उपकरणांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मराठवाड्यातील लाखो रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.
    मा. डी. पी. सावंत साहेबांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणी म्हणून मर्यादित नाही. ते एक अभ्यासू विचारवंत, संवेदनशील समाजसेवक, शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी, कुशल प्रशासक आणि सर्वसामान्य माणसांच्या दुःखाशी नाळ जोडणारे लोकनेते आहेत. त्यांनी असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली, अनेक युवकांना योग्य दिशा दिली, गरीब कुटुंबांच्या अडचणी सोडविल्या आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य केले.
     त्यांच्या कार्यात सेवा, समर्पण, त्याग, निष्ठा, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती, विकासाची तळमळ आणि माणुसकीचा जिव्हाळा यांचा अद्भुत संगम दिसून येतो. म्हणूनच आजही समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिक त्यांच्याविषयी आदर, विश्वास आणि आपुलकीची भावना बाळगतात.
     आजच्या बदलत्या काळात शिक्षण, समाजकारण, क्रीडा, युवकांचे सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकास यांचा समतोल साधणाऱ्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे. मा. डी. पी. सावंत साहेबांचे कार्य हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांनी घडविलेली शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि विकासाची परंपरा पुढील अनेक दशकांपर्यंत समाजाला दिशा देत राहील, यात कोणतीही शंका नाही.
     मा. डी. पी. सावंत साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
     ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य, अखंड कार्यशक्ती आणि समाजसेवेची अधिकाधिक संधी देवो. त्यांच्या विचारांचा प्रकाश आणि कार्याची प्रेरणा अशीच असंख्य विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला उजळत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.


 *गुलाबराव बालासाहेब मदने* 
शा.शिक्षक
श्री.शारदा भवन हायस्कूल अर्धापूर ता.अर्धापूर जि.नांदेड
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.

Share

Other News

ताज्या बातम्या