शेटे महाविद्यालयात ८० वा *भारतीय स्वातंत्र्य दिन* उत्साहात साजरा

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/08/2026 5:03 PM

शेटे महाविद्यालयात ८० वा *भारतीय स्वातंत्र्य दिन* उत्साहात साजरा

   शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ भगूरचे विश्वस्त श्री. सतीश यशवंत कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भगूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. प्रसाद अंबादास आडके तसेच पालक-शिक्षक संघाचे श्री. जयराम चव्हाणके उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या व थोर युगपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण वंदेमातरम या राष्ट्रीय गीता नंतर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने कार्यक्रमस्थळी देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी निवड प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनरल सेक्रेटरी म्हणून कु. साक्षी राहुल झनकर, लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कु. वृषाली भरत कोकणे, तर जिमखाना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून चि. श्रीनाथ श्रीरंग बडदे यांची निवड झाली. तसेच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून चि. शुभम शिंगाडे, कु. सोनाली जयराम चव्हाणके, कु. समीक्षा गोरख बोराडे, कु. गायत्री सचिन हासे, कु. प्रणिती मेंढे आणि कु. रोशनी राजाराम आडके यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. प्रेरणा कुलकर्णी आणि प्रा. पूनम रेस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण केले. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या विकासात योगदान द्यावे. शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम ही मूल्ये जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे श्री. प्रसाद अंबादास आडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य हे केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नसून, देशाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेम जोपासावे, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. सतीश कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वगुण विकसित करावेत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन महाविद्यालयाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी केले. त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेऊन राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया हांडोरे यांनी केले. उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Other News

ताज्या बातम्या