खा. वसंतराव चव्हाण जयंती निमित्त राज्यस्तरीय लोकशाही वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/08/2026 8:50 PM

नांदेड : स्वातंत्र्य दिन तसेच दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काँग्रेस कमिटीचे उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘लोकशाही वक्तृत्व स्पर्धे’ला राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशातील सद्यस्थिती, लोकशाहीसमोरील आव्हाने, युवकांची भूमिका आणि विविध ज्वलंत सामाजिक-राजकीय प्रश्नांवर स्पर्धकांनी परखड मते मांडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रविंद्र चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, डॉ. रेखाताई चव्हाण, अब्दुल गफार, आनंद चव्हाण, मुन्ना आब्बास, गणेश ढगे, बाबा गौड, सत्यपाल सावंत, सुरज शिंदे, अक्षय नळगे, श्रीनिवास मोरे, अंबादास रातोळे, जेसिका शिंदे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजक तथा काँग्रेस कमिटीचे उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी प्रास्ताविक केले. दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसची विचारधारा शेवटपर्यंत जनमानसात रुजविण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ज्वलंत प्रश्न आणि विविध धोरणांवर युवकांमध्ये वैचारिक मंथन व्हावे, हा स्पर्धेमागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात खासदार रविंद्र चव्हाण म्हणाले, “वक्तृत्व स्पर्धांमधून युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित होतात. देशाच्या भवितव्यासाठी युवकांनी सक्रियपणे पुढे येणे आवश्यक आहे. युवकांच्या प्रश्नांसाठी राहुल गांधी खंबीरपणे उभे आहेत.”

स्पर्धेत विशाल सवने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रोहित आढाव व ऋषिकेश कदम यांनी द्वितीय, तर आदित्य दराडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सानिया शेख, वैभव बांगळे, गोविंद भांड, अलका खाडे, प्रीती जाधव आदींना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

परीक्षक म्हणून डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, डॉ. संदीप काळे व डॉ. विजय पवार यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. स्पर्धेला श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

चौकट :  खा.राहुल गांधी  "नफरत की दुकान मे मोहब्बत का दुकान..!"
 

स्पर्धेत विद्यार्थिनींनीही विविध ज्वलंत विषयांवर प्रभावीपणे मते मांडत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भारत छोडो आंदोलनापासून राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेपर्यंतचा प्रवास, नीट पेपरफुटी व विविध परीक्षा घोटाळे, जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, देशातील सामाजिक ऐक्य आणि न्याय-समतेचे प्रश्न यावर त्यांनी भाष्य केले.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेने देशातील माणसे जोडण्याचा प्रयत्न केला असून ती न्याय आणि समतेचा संदेश देणारी असल्याचे मत काही स्पर्धकांनी व्यक्त केले. ‘नफरत की दुकान में मोहब्बत की दुकान’ या विचाराचा संदर्भ देत त्यांनी द्वेषाऐवजी प्रेम, बंधुता आणि सामाजिक सलोखा आवश्यक असल्याचे सांगितले.

‘जेन झी’ ही केवळ पिढी नसून बदलाची चळवळ आहे, युवक हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहेत, तसेच देशाला गांधी विचारांची गरज आहे, अशा विविध विषयांवर स्पर्धकांनी परखड आणि अभ्यासपूर्ण विचार मांडले.

Share

Other News

ताज्या बातम्या