श्री शारदा भवन हायस्कूलमध्ये जंक फूडमुक्त शालेय परिसराचा संदेश

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/08/2026 6:23 PM

अर्धापूर :- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘जंक फूडमुक्त शालेय परिसर’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अरुण कल्याणकर होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्रीडा विभाग प्रमुख श्री. गुलाबराव मदने यांनी जंक फूडच्या अतिसेवनामुळे होणारे लठ्ठपणा, पचनाच्या समस्या, एकाग्रतेवर होणारे परिणाम यांसह विविध आरोग्यविषयक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वअनुशासन, आरोग्य-जागरूकता, स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन केले.
    अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्याध्यापक अरुण कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक असल्याचे सांगितले. जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आकर्षक पण अपौष्टिक पदार्थांपेक्षा फळे, पालेभाज्या, कडधान्ये, शेंगदाणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, घरगुती पौष्टिक पदार्थ आणि पुरेसे पाणी यांना आपल्या दैनंदिन आहारात प्राधान्य द्यावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.
   “आजची आरोग्यदायी आहाराची सवय ही उद्याच्या निरोगी जीवनाची भक्कम पायाभरणी आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः सकस आहार स्वीकारण्यासोबतच आपल्या कुटुंबात व मित्रपरिवारातही आरोग्यदायी आहाराचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन केले. 
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन आत्माराम कदम यांनी मानले.
   या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील अनिल सवडतकर, आर. एस. खांडरे, एस. एस. डोईबळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे आणि व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
   ‘सकस आहार , निरोगी विद्यार्थी  उज्ज्वल भविष्य’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, स्वच्छता व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या