महिला मंडळ शाळेत शिष्यवृत्तीधारक विदयार्थ्यांचा गुणगौरव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/08/2026 9:06 AM

पंढरपूर : पंढरपूर महिला मंडळ संचलित महिला मंडळ शाळेत इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवठेकर शाळेचे मुख्याध्यापक तथा पक्षीमित्र व्ही. एम. कुलकर्णी सर होते, तर नवनीत प्राथमिक विद्यालयाच्या  वीणा व्होरा मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा मेधा दाते मॅडम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी महिला मंडळ शाळा ही पंढरपूरातील सर्वात प्रथमच्या खासगी शाळांपैकी एक असल्याचे सांगत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शासनामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. संघर्ष लखन छापछडी याने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले, तर पियुष महेश सगर याने तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तसेच शिवन्या दीपक पवार आणि श्रेया तानाजी घोडके या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांच्या पालकांसह विशेष गुणगौरव करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लोखंडे मॅडम यांनी शाळेची सुरू असलेली शैक्षणिक प्रगती तसेच भविष्यातील शैक्षणिक उद्दिष्टांचा आढावा मांडला. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सौ. अर्पिता कुलकर्णी मॅडम आणि श्री. अनिल लवटे सर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मार्गदर्शनाची माहिती दिली. पालकांनीही मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विशेषतः संघर्ष लखन छापछडी याने, “शिक्षकांनी आणि या शाळेने आमच्या पंखातील बळ आम्हाला ओळखायला लावले,” असे भावपूर्ण मत व्यक्त करून उपस्थितांवर आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. एम. कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे आणि उंच भरारी घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रमुख पाहुण्या वीणा व्होरा मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव डॉ. सौ. वर्षा काणे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. 
 या कार्यक्रमासाठी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका यांच्यासह माजी शिक्षिकांही उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाचे आभार उर्मिला भाटे यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्री. अनिल लवटे सर यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गौरव सोहळा त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Share

Other News

ताज्या बातम्या