दोन वर्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले व्यापक अभियानाचे स्वरूप, नशामुक्त सांगलीसाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/08/2026 7:22 PM

सांगली, दि. २३ ऑगस्ट २०२६ :
सांगली जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात भय व नशा मुक्त अभियान समिती, सांगली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जनजागृती आणि पाठपुरावा करत आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात अभियान राबवून आतापर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले असून, हे अर्ज जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांच्याकडे सादर करून अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता सांगली येथे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली “नशामुक्ती निर्धार पदयात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेचे प्रारंभस्थळ कल्पवृक्ष मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली असून सांगता पोलीस मुख्यालय, सांगली येथे होणार आहे.
या उपक्रमाचे भय व नशा मुक्त अभियान समिती, सांगली जिल्हा मनापासून स्वागत व अभिनंदन करते. कारण गेल्या दोन वर्षांपासून समितीने सातत्याने मांडलेला हा प्रश्न आता व्यापक पातळीवर शासन आणि प्रशासनाच्या अजेंड्यावर आला आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
अमली पदार्थांच्या विळख्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. माता-भगिनी, पालक, विद्यार्थी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे भविष्य धोक्यात येत असून, या समस्येचे सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर परिणाम गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर केवळ जनजागृतीचा कार्यक्रम न करता अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीवर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
एक दिवसाची पदयात्रा नव्हे, कायमस्वरूपी कृती आराखडा हवा!
पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांनी आयोजित केलेली ही पदयात्रा निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, ही पदयात्रा केवळ फोटोसेशन, प्रसिद्धी किंवा एका दिवसाच्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहू नये, अशी स्पष्ट भूमिका भय व नशा मुक्त अभियान समितीची आहे.
सांगली जिल्हा खऱ्या अर्थाने भय व नशामुक्त होईपर्यंत पुढीलप्रमाणे दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज आहे—
अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कठोर व सातत्यपूर्ण कारवाई.
शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि तरुणांच्या परिसरात विशेष जनजागृती व निगराणी व्यवस्था.
अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी प्रभावी आणि सुरक्षित यंत्रणा.
व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन, उपचार व पुनर्वसनाच्या सुविधा वाढविणे.
प्रत्येक तालुक्यात नियमित व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविणे.
पोलीस, महसूल, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा समन्वय साधून संयुक्त कृती आराखडा तयार करणे.
अमली पदार्थांच्या कारवाईचा नियमित आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय कायमस्वरूपी समिती स्थापन करणे.
शाळा-महाविद्यालये तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
“नशामुक्त सांगली” हा केवळ घोषवाक्याचा विषय न राहता तो जिल्ह्याचा दीर्घकालीन संकल्प झाला पाहिजे, अशी मागणी भय व नशा मुक्त अभियान समिती करत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून समितीने कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय हा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. ३५ ते ४० हजार नागरिकांचा सहभाग, जनजागृती, अर्ज संकलन आणि प्रशासनाकडे सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे या प्रश्नाला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे. उद्याची पदयात्रा ही त्या व्यापक जनभावनेला मिळालेली सकारात्मक दखल आहे.
मात्र, “पदयात्रा संपली म्हणजे अभियान संपले असे होऊ नये. पदयात्रेनंतर खरी लढाई सुरू झाली पाहिजे,” अशी भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.
भय व नशा मुक्त अभियान समिती सांगली जिल्हा यापुढेही या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवणार असून, प्रशासनाकडून प्रत्यक्षात किती आणि कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा पाठपुरावा करणार आहे. सांगली जिल्हा पूर्णपणे भयमुक्त आणि नशामुक्त होईपर्यंत हे अभियान सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार समितीने केला आहे.


— भय व नशा मुक्त अभियान समिती, सांगली जिल्हा
समितीचे प्रमुख कार्यकर्ते :
तानाजी सावंत | सतीश साखळकर | कुलदीप देवकुळे | शंभूराज काटकर | रवींद्र वळवडे | लालू उर्फ युसुफ मिस्त्री | उमेश देशमुख

Share

Other News

ताज्या बातम्या