शेटे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/09/2026 5:17 PM

शेटे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
देवळाली कॅम्प : येथील श्री एकनाथराव सहादू शेटे कला,वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ  महाविद्यालयातील 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' आणि 'व्यवसाय रोजगार मार्गदर्शन समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी नुकतेच स्पर्धा परीक्षा व रोजगार संधी या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
 कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले शासकीय कौशल्य विभाग तज्ञ श्री अविनाश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून, अभ्यासात सातत्य, वेळेचे अचूक नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक आहे." त्यांनी विविध सरळसेवा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि मुलाखतीची तयारी कशी करावी,विविध परीक्षांच्या तयारीसाठी शासनातर्फे मिळणारी शिष्यवृत्ती याविषयी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे  उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, "आजच्या काळात पदवीबरोबरच अवांतर वाचन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणे काळाची गरज बनली आहे. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व रोजगार समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे."
 यावेळी व्यवसाय रोजगार मार्गदर्शन समितीच्या माध्यमातून भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध रोजगार मेळावे आणि कौशल्य विकास उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. भरत सपकाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रेरणा कुलकर्णी  यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका रोहिणी जगताप यांनी मानले. या उपयुक्त व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या