राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेत्या कुंदाताई बच्छाव यांचे नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी केले अभिनंदन.
सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रामध्ये येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन एकानंतर एक अशा 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत सदर विद्यार्थिनींना यामध्ये येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून शिक्षण घेण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करून एक आश्वासक आणि समर्पित योगदान नाशिक महानगरपालिका विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यामंदिर, आनंदवली (शाळा क्रमांक 18) मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिका माननीय कुंदा शिंदे बच्छाव यांना या विशेष व प्रभावी शिक्षण सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे.
त्यांच्या या उत्तुंग यशाची बातमी समोर येताच सामाजिक क्षेत्रातील अव्वल व्यक्तिमत्व, नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी कोणताही विलंब न करता त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आपले सहकारी रोहिणीताई वाघ, अविनाशभाऊ वाघ, अजयभाऊ चव्हाण, संजय बलकवडे, दिलीपभाऊ गायकवाड, श्याम डावरे, सुनील जाधव यांच्यासह पुरस्कार विजेत्या मा. कुंदाताई शिंदे बच्छाव यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी अमोलभाऊ भागवत यांनी प्रतिपादन केले की, हा एका शिक्षिकेच्या सातत्यपूर्ण, संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण कार्याचा गौरव आहे, त्यांनी शिक्षकाची भूमिका केवळ वर्गखोलीपुरती मर्यादित ठेवली नाही. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा, सर्वांगीण विकासाचा विचार, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांना व्यापक जगाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या कार्याच्या विविध पैलूंमधून याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसत आहेत. त्यांच्या या कार्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांकडे केवळ ‘विद्यार्थी’ म्हणून न पाहता त्यांच्या गरजा, क्षमता, अडचणी, दृष्टिकोन आणि स्वप्ने समजून घेण्याची त्यांची संवेदनशील वृत्ती. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो; तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो हे नक्कीच मा. कुंदाताई शिंदे बच्छाव यांना ठाऊक आहे. ही भूमिका त्यांनी आपल्या कृतीतून जपली आहे व ती भूमिका अधिकाधिक सजवत आहेत.
पुरस्कार मोठा आहे...पण त्यामागची कर्मभूमी त्याहून मोठी आहे! एका शिक्षकाला पुरस्कार मिळतो तेव्हा त्या शिक्षकाचा सन्मान होतोच, पण त्या शिक्षकाच्या माध्यमातून सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा सन्मान होतो असे वक्तव्य शिक्षक अविनाश वाघ, रोहिणीताई वाघ, संजय बलकवडे यांनी यावेळी केले.
हा सन्मान आहे... एक दूरदृष्टीचा, विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या शिक्षकी वृत्तीचा, नाविन्यपूर्ण शिक्षणाचा, सामाजिक बांधिलकीचा, सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवरील विश्वासाचा
आणि आपल्या कर्तृत्वातून शिक्षक या शब्दाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा! .. यानिमित्ताने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, स्वराज्य सोशल ग्रुप आणि सामाजिक प्रतिनिधींकडून राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मा. कुंदाताई शिंदे बच्छाव यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.