नांदेड : पशुपालकांना पशुधनाच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दुधाळ गायीसाठी 70 हजार रुपये, दुधाळ म्हशीसाठी 80 हजार रुपये, बैलासाठी 70 हजार रुपये, रेड्यासाठी 80 हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रत्येकी 7 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. प्रति कुटुंब जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा काढता येणार आहे.
या योजनेअंतर्गत विम्याचा कालावधी एक, दोन किंवा तीन वर्षांचा असून, विमा प्रीमियम दर अनुक्रमे 4.30 टक्के, 7.50 टक्के आणि 10.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे. विमा हप्त्यात पशुपालकांचा हिस्सा 15 टक्के असून उर्वरित हिस्सा शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. विमा संरक्षणासाठी पशुधनाची नोंद राष्ट्रीय डिजिटल पशुधन प्रणाली (एनडीएलएम) वर असणे तसेच आवश्यक आरोग्य प्रमाणपत्र व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नियमानुसार विमा दावा करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वैध विमा दावा 15 दिवसांच्या आत मंजूर करून रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. पशुधन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9063142299 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सखाराम खुणे यांनी केले आहे.