नांदेड:-वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न मानता समाजातील गरजू व निराधार विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा प्रेरणादायी उपक्रम डॉ.संतोषकुमार स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. दि.२ सप्टेंबर २०२६ रोजी लहुजी साळवे निराधार,निराश्रित बालकाश्रम, धनगरवाडी रोड,साईबाबा नगर, वाडीपाटी,ता.जि.नांदेड येथे आयोजित या समाजोपयोगी कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व उजळणीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामागे निराधार व निराश्रित विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रमुख उद्देश होता. वाढदिवसाच्या आनंदात सामाजिक बांधिलकीची जोड देत विद्यार्थ्यांसोबत हा दिवस साजरा करण्यात आला.
डॉ.संतोषकुमार स्वामी यांनी मागील पंचवीस वर्षांपासून आरोग्य संपदा होमिओपॅथिक मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य व समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे,आरोग्यविषयक जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविणे अशा अनेक समाजोपयोगी कार्यांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
धार्मिक,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य असून विविध सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा आशीर्वाद लाभलेले डॉ.स्वामी हे गरजू व गोरगरीबांच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारे प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या सौ.नंदाताई पाटील,श्री लक्ष्मण केंद्रे,सौ.सुनंदा स्वामी,कु. स्वर्णिमा स्वामी,कु.आराध्या केंद्रे तसेच लहुजी साळवे निराधार,निराश्रित बालकाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवस समाजसेवेतून साजरा करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
“सेवेतूनच वाढदिवसाचा खरा आनंद!” या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.