श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दिंडी पंढरपूरकडे रवाना

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 03/07/2025 6:31 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

दहिवडी दि:मुखी श्री रामाचा नारा अशा भक्तमय वातावरणात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविक भक्त वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला.

विठ्ठल- रुक्‍मिणी कुलदैवत असल्याने श्री ब्रह्मचैतन्य महाराज नेहमीच पंढरपूरची वारी करत. त्यामुळे येथील पायी दिंडीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीच या दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. या दिंडीत सहभागी होण्यासाठी परगावच्या भाविकांनी कालपासूनच गोंदवल्यात हजेरी लावली होती. 

सकाळी साडेआठच्या सुमारास ‘श्रीं’च्या समाधी मंदिरात प्रतिमा व पादुकांचे विधिवत पूजन केल्यानंतर भाविकांनी श्रीरामाच्या जयघोषात सारा परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजवलेल्या भव्य रथामध्ये समाधी मंदिर समितीच्या विश्‍वस्तांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिमा व पादुका विराजमान करण्यात आल्या अन्‌ पुन्हा श्रीराम नामाबरोबरच ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाला. 

रथासमोर पताकाधारी व टाळकरी अभंगात तल्लीन होऊन नाचत होते. मोठ्या उत्साहात दिंडी पुढे सरकत होती. गावातील थोरले श्रीराम मंदिरात दिंडी विसावल्यानंतर पुन्हा सातारा-पंढरपूर रस्त्यावर आली. गावाच्या वेशीपर्यंत साथ दिल्यानंतर गावकऱ्यांनी गळाभेट घेऊन वारकऱ्यांना निरोप दिला.

दरम्यान, या पायी दिंडीत साताऱ्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, कोकण, कर्नाटक आदी भागातून वारकरी सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी भाविकांनी नाष्टा व चहापानाची व्यवस्था केली होती. दिंडीचा आज म्हसवड येथे मुक्काम होणार आहे. पिलीव, भाळवणी, वाखरी येथे मुक्काम करून ही दिंडी नवमीला (गुरुवारी) पंढरपुरातील श्री गोंदवलेकर महाराजांच्या इसबावी मठात पोचेल.

: श्रींच्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती
             

पळशी येथील वाण्याच्या झाडे येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांसाठी पळशीकरांचे अन्नदान

Share

Other News

ताज्या बातम्या